मुंबई विद्यापीठाचा सावळा गोंधळ संपता संपेना..
एफवायच्या विद्यार्थ्यांना 1 तास उशिरा प्रश्नपत्रिका
मुंबई (अजय निक्ते ) : मुंबई विद्यापीठाकडून सुरू असलेला सावळा गोंधळ अजूनही संपत नाहीय. सोमवारपासून प्रथम वर्ष कला (आर्ट्स) शाखेची परीक्षा सुरू झालीय. पण विद्यार्थाना तब्बल एक तास प्रश्नपत्रिकेची वाट पाहावी लागलीय. सोमवार आणि मंगळवारी दोन्ही दिवशी या गैरसोयीला सामोरे जावे लागल्याने मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी पसरलीय.
सोमवारी दुपारी ३ वाजता प्रथम वर्ष कला (आर्टस्) शाखेचा एफ.सी विषयाचा पेपर होता. मात्र 3:30 पर्यंत प्रश्नपत्रिका आल्या नव्हत्या. मंगळवारी (आज) सी एस विषयाचा पेपर दुपारी ३ वाजताच होता. मात्र आजही ४ वाजेपर्यंत प्रश्नपत्रिका आलेल्या नव्हत्या. यामुळे विदयार्थी वर्गात प्रचंड संताप आणि गोंधळाचे वातावरण पसरले होते. यासंदर्भात कॉलेजची काही चूक नसून मुंबई विद्यापिठात तांत्रिक कारणामुळे प्रश्नपत्रिका डाउनलोड होण्यास उशीर होत असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ वाढवून देण्यात आली असली तरी दोन दिवसांच्या प्रकारामुळे त्यांचा गोंधळ उडाला होता. विद्यापिठाच्या कारभारावर अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केलीय.