मुंबई : देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा आजपासून सुरू झालीय. मुंबई (Mumbai) ते बेलापूर (Belapur) वॉटर टॅक्सीचं लोकापर्ण आणि बेलापूर जेट्टीचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. मुंबई ते नवी मुंबई असा प्रवास आता वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून करता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत बेलापूर येथून सुरू करण्यात आलेल्या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ आणि बेलापूर जेट्टीच्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री ठाकरे, केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

यावेळी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री कपिल पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे बंदर विकास मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार डॉ. विनायक सहस्त्रबुद्धे, खासदार कुमार केतकर, खासदार राजन विचारे, आमदार निरंजन डावखरे, आमदार रविंद्र फाटक, आमदार बाळाराम पाटील, आमदार रमेश पाटील, आमदार मंदा म्हात्रे, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, मेरी टाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुंबईतून सुरू होणाऱ्या सेवांचे अनुकरण संपूर्ण देशभर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आजचा दिवस महत्वाचा आणि आनंदाचा. देशातील पहिली वॉटर टॅक्सी महाराष्ट्रात सुरु होत आहे. केंद्रीय मंत्र्यांनी यास प्राधान्य दिले त्याबद्दल त्यांना धन्यवाद. देशात पहिली रेल्वे सेवा मुंबई ठाणे दरम्यान सुरु झाली. त्यानंतर देशात त्याचे जाळे विस्तारले. मुंबईतून जी सुरुवात होते त्या सुविधांचा प्रसार आणि अनुकरण संपूर्ण देशात होते हे आजवर दिसून आले आहे.
छत्रपतींनी समुद्रावर हुकूमत असली पाहिजे या भावनेने कल्याणमध्ये आरमारची बांधणी सुरु केली तेंव्हापासूनच या परिसराचे महत्व अधोरेखित झाले. त्यानंतर इंग्रजांनी रेल्वे आणली. आपल्याकडील साधनसंपत्तीचे महत्व आपण किती ओळखतो आणि त्याचा जनतेला किती उपयोग करून देतो याकडे लक्ष देणे गरजेचे. एलिफंटाला जाण्यासाठी ही ही जलवाहतूक सेवा उपयोगी ठरणार आहे.

नवी मुंबईला मुंबईशी जोडणारी ही जलवाहतूक सेवा आज सुरु होत आहे. रस्ते, पुल, रेल्वे, मेट्रो, भुयारी रेल्वे यामध्ये आधुनिकीकरणाची कास धरत आज वॉटर टॅक्सी सुरु झाली. समुद्राचा उपयोग फक्त सुर्योदय सुर्यास्त पाहण्यासाठी नाही. समुद्राचा उपयोग वाढला पाहिजे. आर्थिक विकासाची चळवळ गतिमान करतांना जलवाहतूक असेल किंवा अन्य काही त्याचा उपयोग वाढला पाहिजे. येत्या दोन तीन वर्षात समुद्राचे खारे पाणी आपण गोड करत आहोत. मुंबई- पुणे रस्ता असेल, मुंबईतील ५५ उड्डाणपूल असतील, सागरी किनारा मार्ग असेल , मुंबई- कोकणाला जोडणारा सागरी मार्ग असेल, शिवडी न्हावा शेवा मार्ग असेल असे परिवहनाचे जाळे आपण विकसित केले आहे.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी, ती जगाशी हवाई मार्गाने जोडली. पण एमएमआर रिजनला जोडणारी ही सेवा महत्वाची आहे, कामासाठी, उद्योग व्यवसायासाठी मुंबई येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला ही सेवा अधिक उपयुक्त सिद्ध होईल. वॉटर प्लेन हा ही आणखी एक मार्ग आहे. नवी मुंबई विमानतळ विकसित होत आहे, नवी मुंबई स्पोर्टस सिटी म्हणून विकसित होत आहे हे सर्व लक्षात घेता येथे अनेक पायाभूत सुविधांचा राज्य शासनामार्फत विकास केला जात आहे. उद्योजक ही गुंतवणूक करतांना पायाभूत सुविधांचा विचार पहिल्यांदा करत असतात त्यादृष्टीनेही या सर्व कामांना वेगळे महत्व आहे. या प्रकल्पाला ज्यांचें ज्यांचे सहकार्य लाभले त्यांना धन्यवाद. ही सर्व कामे जनतेसाठी आहेत. पक्षीय मतभेद विसरून सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याची गरज आहे. कोणत्याही लोकोपयोगी कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. जनतेच्या हिताचे काम करतांना केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला बलशाली बनवण्यासाठी एकत्र येऊन काम करूया, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महाराष्ट्र देईल अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

१.०५ लाख कोटीचे १३१ प्रकल्प महाराष्ट्रासाठी : केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले की, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी महत्वाचा. राज्य शासनाच्या सहकार्याने बेलापूर जेट्टीचे बांधकाम करण्यात आले. याबद्दल राज्यातील जनतेला आणि राज्य सरकारला धन्यवाद. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सागर किनारपट्टी जिल्ह्यात सागरमाला प्रकल्पांतर्गत विविध पायाभूत सुविधांचे काम सुरु आहे. यातून सागरतटीय जिल्ह्यातील लोकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न, यातून रोजगार निर्मिती करून आर्थिक विकासाचे चक्र गतिमान करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.. कोरोना काळातही बेलापूर जेट्टीचे काम सुरु राहिले. नवी मुंबई ते दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या या जलवाहतूक सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होईल. रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होईल. आणखी काही जे्ट्टी मुंबई हार्बर भागात प्रस्तावित आहेत. मुंबई ते अलिबाग रो रो सेवा सुरु झाली आहे. वॉटर टॅक्सीला मिळणारा प्रतिसाद पाहून जलवाहतूकीसाठी अतिरिक्त जेट्टीचे बांधकाम केले जाईल.

केंद्रीय नौवहन मंत्रालयाकडून सागरातटीय राज्यांच्या सहकार्याने बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, जेट्टीचे निर्माण, कौशल्य विकास आशा विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. सागरमाला कार्यक्रमातून जलद आर्थिक विकासाला चालना देण्यात येत आहे. १.०५ लाख कोटीचे १३१ प्रकल्प महाराष्ट्रासाठी निश्चित करण्यात आले आहेत. यात सागरमाला कार्यक्रमांतर्गत 46 प्रकल्पास 278 कोटीचे वित्तीय सहाय्य देण्यात येईल. मुंबई आणि महाराष्ट्राच्या सागरतटीय जिल्ह्यांना या प्रकल्पांचा लाभ होईल. महाराष्ट्राला अर्बन वॉटर ट्रान्सपोर्टेशनला प्रचंड वाव आहे. रेल्वे, रोड परिवहन सेवेबरोबर जलवाहतूक सेवा नागरिकांना अधिक चांगली परिवहन सेवा उपलब्ध करील. चार क्ल्स्टर मध्ये पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्या बांधवांच्या सक्षमीकरणाचे काम करण्यात येत असल्याचे सांगतांना त्यांनी ससुन डॉकसह सिंधुदूर्ग आणि रायगडच्या बंदरांच्या आधुनिकीकरणासाठी काम सुरु असल्याचेही सोनोवाल म्हणाले.

जगात सर्वात स्वस्त वाहतूक ही जलवाहतूक . : अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मेट्रो , मोनो नंतर जलवाहतूक प्रकल्प आज सुरु होत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगडकरांसाठी आजचा दिवस अभिमानाचा दिवस. राज्याच्या जलवाहतूकीचा विकास आणखी गतीने व्हावा. जलवाहतूकीचे अनेक प्रकल्प गडकरी यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता आता ही जबाबदारी सोनोवाल साहेबांवर आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय हिस्सा दिल्याबद्दल सोनोवाल यांचे आभार. गेट वे ऑफ इंडियाजवळ केंद्र शासनाच्या तर्फे आणखी एक प्रकल्प प्रस्तावित आहे. तो लवकर सुरु व्हावा यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू या असे आवाहन केंद्रीय मंत्र्यांना करत आहे. जलवाहतूक ही सर्वात स्वस्त वाहतूक आहे. काही महत्वाचे प्रकल्प धाडसाने सुरु करावे लागतील जेणेकरून दाट लोकवस्ती असलेल्या ठाणे, नवी मुंबईकरांना याचा लाभ होईल. यामध्ये पर्यावरणाचाही विचार आहे. सर्व मिळून या कामांना गती देऊ या. आज चार मार्गावर जल टॅक्सी सेवा सुरु होत आहे. प्रवाशांचा वेळ, पैसा श्रम तर यामुळे वाचेलच परंतू प्रदुषणालाही आळा बसेल.

जगात सर्वात स्वस्त वाहतूक ही जलवाहतूक आहे. त्यानंतर रेल्वे आणि रस्ते वाहतूकीचा नंबर लागतो. सुदैवाने एमएमआरक्षेत्राला लागून खाडी आहे त्यामुळे जलवाहतूकीला चालना देऊन या सुविधेचा लाभ घेता आला पाहिजे. सुरक्षित प्रवासाला चालना देत ही जलवाहतूक सेवा सुरु केली तर प्रवाशांनाही सुलभ सुविधा उपलब्ध होईल. पायाभूत सुविधांसाठी निधी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा आग्रह असतो असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. महाराष्ट्राच्या भल्यासाठी सगळे मिळून काम करू असे आवाहन ही त्यांनी केले. मेट्रो चे काम पूर्ण झाले, जलवाहतूक सुरु झाली तर एमएमआरचे रुप एकदम पालटलेले दिसेल असेही ते म्हणाले.

ठाणे- मुंबई सेवाही लवकरच सुरु होईल : एकनाथ शिंदे

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील वाहतूकीस आज या वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून चालना देण्यात आली आहे. जलवाहतूक किफायतशीर, पर्यावरणस्नेही वाहतूक सेवा आहे. ठाणे, कल्याण, नवी मुंबईकरांना जलवाहतूक सेवा उपलब्ध झाली तर रस्त्यावरची वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. आज या सेवेची सुरुवात झाली ही आनंदाची गोष्ट. ठाणे- मुंबई सेवाही लवकरच सुरु होईल. एमएमआरक्षेत्रातील वाढत्या नागरिकीकरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम एमएमआरडीए, सिडकोच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सागरमाला कार्यक्रमातून केंद्र आणि राज्याच्या ५०: ५० टक्क्यांच्या सहभागातून बंदर विकासाच्या कामाला गती दिली आहे. सिडकोनेही एक उत्तम आणि मोठ्ठी जेट्टी बांधली आहे. सर्वसामान्यांना आरामदायी प्रवास करणे यामुळे शक्य होईल. ही पर्यावरणस्नेही वाहतूक सेवा आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, अशा विविध ठिकाणाहून जलवाहतूक सुरु झाल्यास प्रवाशांना उत्तम परिवहन सेवा उपलब्ध होईल. काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना मार्गी लावल्याबद्दल केंद्रीय नौवहन मंत्र्यांचे आभार व्यक्त करत असल्याचेही ते म्हणाले. शासन या सर्व प्रकल्पांना पूर्ण सहकार्य करील अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.

जलवाहतुकीत महाराष्ट्र देशात नंबर एक राज्य ठरेल : अस्लम शेख

बंदर विकास मंत्री अस्लम शेख म्हणाले की, कोरोनाकाळातही वर्षानुवर्षे रखडलेली कामे एकेक करून पूर्ण करत आहोत. जलवाहतूकीची ही सेवा आज १६ लाख लोकांना उपलब्ध करून देत असलो तरी ही सेवा अधिक व्यापक करण्याची गरज आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी आहे. जीवनाचा अर्धा वेळ एमएमआर क्षेत्रात प्रवासात जातो की काय असे वाटते. नॅशनल वॉटर वेजचे, जेट्टी बांधण्याचे काही प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यास मान्यता मिळाली तर वाहतूक कोंडी फोडण्यास नक्कीच मदत होईल.जलवाहतूकीमध्ये महाराष्ट्र देशात नंबर एक राज्य ठरेल. मुंबई ते ठाणे जलवाहतूक सुरु करण्यास उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. भाऊचा धक्का ते मांडवा मध्ये रो रो सेवा शासनाने सुरु केली आहे. त्यामुळे प्रवाशांचा ३ ते साडेतीन तासाचा वेळ वाचत आहे. महाराष्ट्रातील असे प्रकल्प वाढण्याची गरज आहे. जलवाहतूक सुरु केली तर ती सर्वसामान्यांना परवडणारी ठरते असेही शेख यावेळी म्हणाले.

पर्यटकांची सोय होईल, पर्यटन वाढेल : अब्दूल सत्तार

अब्दुल सत्तार म्हणाले की, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातून समुद्र पाहण्यास येणाऱ्यांना या वॉटर टॅक्सीची उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे. यातून पर्यटकांची सोय होईल, पर्यटन वाढेल. देश आणि राज्य भरातून येणाऱ्या लोकांना ही सेवा उपयुक्त सेवा देईल. कोरोना संकटातही विकास कामांना शासनाने चालना दिली. त्याला कुठेही निधी कमी पडू दिला नाही. याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद देत असल्याचेही ते म्हणाले.

वॉटर टॅक्सीचे भाडे दर सर्वसामान्यांना परवडणारे असावेत : मंदा म्हात्रे

आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात म्हटले की, ही आठवी जेट्टी आहे. नवव्या जेट्टीचे काम ही लवकरच सुरु होत आहे. आज प्रवासी जेट्टीचे उदघाटन आपण करत आहोत. मरीना जवळ येत आहे, पर्यटन स्थळ निर्माण होत आहे. याला गती देण्यासाठी निविदा प्रक्रिया नव्याने राबवावी.   महाराष्ट्र भवनाचे काम वेळेत मार्गी लागावे.  वॉटर टॅक्सीचे भाडे दर सर्वसामान्यांना परवडणारे असावेत अशी मागणीही त्यांनी केली.

प्रति प्रवासी भाडे इतके ….
स्पीडबोटीचे भाडे प्रति प्रवासी रु. 825 ते रु. 1210 तर कॅटामरान बोटीकरीता प्रति प्रवासी रु 290 इतके ठेवण्यात आले आहे. बेलापूर येथून भाऊच्या धक्क्याबरोबरच एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावर सुद्धा प्रवासी सेवा चालविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!