मुंबई शिक्षक मतदार संघासाठी शिक्षण संघटना मैदानात : ज्ञानदेव हांडे यांना उमेदवारी
घाटकोपर : आगामी मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय शिक्षक संघटनेने घेतला असून यासाठी संघटनेचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर हांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा शिक्षक म्हणुन हांडे यांची ओळख आहे. कै. तुळशिराम सावते विद्यालयात जून 1999 पासून विनाअनुदानित तत्वावर कार्यरत आहेत. 2010 – 11 मध्ये अनेक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शंभर टक्के अनुदानावर घोषित होऊनही निधी अभावी प्रत्यक्ष वेतन सुरु झाले नाही. त्यासाठी संघटनेने मोठा लढा उभा केला. मुंबई मनपा शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असणार्या खाजगी प्राथमिक शाळांच्या अनुदानासाठी आझाद मैदानावर अनेक आंदोलने केली. जुनी पेन्शन, अतिरिक्त शिक्षक, रात्र शाळांच्या नोकरीवर गदा, शिक्षकेतर कर्मचार्यांचा आकृतीबंध, सरल स्टुडंट पोर्टल, ऑनलाइन कामांचा अतिरिक्त भार, वरिष्ठ व निवड श्रेणीच्या जाचक अटी अशा अनेक समस्यांनी शिक्षकांना त्रस्त केले आहे. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आगामी शिक्षक मतदार संघ निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे हांडे यांनी सांगितले.