मुंबई, दि. १४ः धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने (ठाकरे) गटाने अदानी विरोधात दंड थोपटले असून येत्या १६ डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, धारावी पोलीसांनी या मोर्चासाठी मुंबई पोलीस आयुक्तांची परवानगी घ्या, असे पत्र शिवसेनेला (ठाकरे) पाठवले आहे. अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या मोर्चासाठी धारावी पोलिसांनी परवानगीचा चेंडू मुंबई पोलीस आयुक्तांच्या कोर्टात टोलविल्याने ठाकरेंच्या शिवसेनेची धावपळ उडाली आहे.
धारावी झोपडपट्टी पुनर्विकास अदानी समुहामार्फत करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे. या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात टीडीआर घोटाळा झाला आहे. कोणत्याही निकषाची पूर्तता न करता, परस्पर पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी समुहाला दिल्याचा शिवसेनेचा (ठाकरे) आरोप आहे. धारावीकरांची यातून फसवणूक करण्यात येत आहे. तसेच धारावीकरांच्या लघुद्योगासहित ४०० ते ५०० चौरस फूटाची घरे मिळावीत, ही शिवसेनेची (ठाकरे) मुख्य मागणी आहे. या सर्व मुद्द्यांवरून अदानी समुहाला जाब विचारण्यासाठी पक्षप्रमुख (ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी येत्या १६ डिसेंबरला मोर्चाचा नारा दिला. मोठ्या संख्येने मुंबईकरांनी मोर्चात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. तसेच या मोर्चाला परवानगी मिळावी, यासाठी धारावी पोलीस प्रशासनाला पत्र पाठवले.
धारावी पोलीस ठाण्याचे उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या (ठाकरे) मोर्चाच्या परवानगीचा चेंडू मुंबई पोलीस आयुक्तांकडे ढकलला आहे. आयुक्तांच्या आदेशानंतरच मोर्चाला परवानगी मिळेल, त्यामुळे त्यांच्याकडे अर्ज करा, असे पत्राद्वारे उत्तर दिले आहे. शिवसेनेची यामुळे कोंडी झाली असून तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. आता मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यावर काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्वाचे आहे.