मुंबईचा विकास आराखडा डीसीआरसह मंजूर करणार –  डॉ. रणजित पाटील

मुंबई,  : मुंबईचा विकास आराखडा मार्चअखेर मंजूर करण्यात येईल. हा विकास आराखडा डीसीआरसह देण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.

मुंबईच्या विविध प्रश्नाच्या संदर्भात नियम 260 अन्वये सदस्य ॲड.अनिल परब व अन्य सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना डॉ. रणजित पाटील म्हणाले, मुंबईतील मोकळ्या जागांना धक्का लावला जाणार नाही. छाननी समितीमार्फत प्रत्येक आरक्षणावर स्वतंत्र विचार होत असून याबाबत डीसीआरमध्ये व्यवस्था करण्यात येईल. विमानतळ परिसरातील इमारतींना एफएसआय वापर करता येत नाही त्यांना टी.डी.आर. स्वरुपात लाभ देण्याचा विचार आहे. मुंबईतील नद्यांचे पुनर्जीवन करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईतील वाहतुकीच्या समस्येचा सर्वंकष अभ्यास करुन टप्प्या-टप्प्याने प्रकल्प राबविण्यात येत आहे. मुंबईतील मेट्रो रेल्वेचे काम 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कोस्टल रोड योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मलनि:स्सारण पद्धतीमध्ये सुधारणा करणे गरजेचे असून याबाबत कार्यवाही करण्यात येईल. तसेच मुंबईतील पावसाचे पाणी जलद वाहून जाण्यासाठी ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. फेरीवाला क्षेत्रासंदर्भात 20 सदस्यांनी समिती नेमली आहे. सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलासाठी नवीन गाड्या घेण्यात आलेल्या आहेत. नवीन अग्निशमन केंद्र सुरु करण्यात येणार आहे. तसेच नव्याने पद निर्मिती करण्यात येणार आहे. मुंबईत औषधोपचारासाठी राज्यभरातून तसेच देशातून नागरिक उपचारासाठी येत असतात. त्यांच्या सोबत येणाऱ्या नातेवाईकांची सोय व्हावी म्हणून खासगी संस्था यांना जागा उपलब्ध करुन देण्याबाबत विचार करण्यात येईल. तसेच मुंबईतील रुग्णालयात 10 टक्के खाटा आर्थिक दुर्बल घटकातील लोकांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. याबाबतची योग्य माहिती ऑनलाईन ठेवण्याची व्यवस्था केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!