मुंबई काँग्रेसचा गुरुवार ११ जुलै रोजी अदानी विरोधात जनआक्रोश मोर्चा*.

मुंबई, दि. १० जुलै :  महागाईने जनता त्रस्त असताना महायुती सरकारने वीज दर वाढ करुन जनतेचे कंबरडे मोडले आहे. ही दरवाढ केवळ ७ टक्के असल्याचा सरकारचा दावा असला तरी प्रत्यक्षात मात्र ही दरवाढ ३० टक्के आहे. एवढी मोठी दरवाढ सर्वसामान्य जनतेला परवडणारी नाही. वीज दरवाढीबरोबरच सरकारने स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या स्मार्ट मीटर मधून अदानी उद्योग समूहाचा फायदा होणार असून जनतेचे मात्र दिवाळे निघणार आहे. काँग्रेस पक्षाचा स्मार्ट मीटर व वीज दरवाढीला विरोध असून सरकारने दोन्ही रद्द करावे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात प्रसार माध्यमांशी बोलताना प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महायुती सरकार महागाई नियंत्रणात आणू शकत नाही उलट दरवाढ करून जनतेला महागाईच्या खाईत लोटत आहे. जुन महिन्यापासून केलेली वीज दरवाढ ही प्रचंड असून सर्वसामान्य जनतेला ती परवडणारी नाही. काही कुटुंबांना २०-२० हजार रुपयांचे वीज बिल आल्याच्या तक्रारी येत आहेत. अदानी समुह १७०० रुपयाला मिळणारा कोळसा आयात करुन १७ हजार रुपयांना घेतो व हा वाढीव खर्च सर्वसामान्यांच्या माथी मारून तो वसूल केला जातो. स्मार्ट मीटरला जनतेचाही तीव्र विरोध असून केवळ अदानीचे खिसे भरण्यासाठी सरकारने स्मार्ट मीटर आणले आहेत. मुंबईत १० लाख स्मार्ट मीटर बसवणे व त्याच्या मेंटेनन्सचा ठेका अदानी समुहाला मिळालेला आहे. स्मार्ट मीटरमुळे जनतेच्या खिशाला कात्री तर लागणारच आहे पण मीटर रिडिंगचे काम करणाऱ्या हजारो लोकांच्या रोजगारावरही गदा येणार आहे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

वीज दरवाढ व स्मार्ट मीटरविरोधात मुंबई काँग्रेस गुरुवार दिनांक ११ जुलै २०२४ रोजी दुपारी २ वाजता बीकेसी मधील अदानी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे. महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वाखाली तसेच काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत.या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत, मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते उपस्थित होते.                                                    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!