पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात १२ फेब्रुवारीला मुंबईतील २१ प्रमुख स्थानकांवर काँग्रेसतर्फे “जन जागरण आंदोलन”
मुंबई : संपूर्ण देशात मुंबईमध्येच पेट्रोल आणि डीझेलची प्रती लिटर किंमत जास्त आहे. या वाढत्या पेट्रोल आणि डिझेल विरोधात आवाज उठविण्यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे १२ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १२ वाजता मुंबईतील प्रमुख २१ रेल्वे स्थानकावर या अन्यायकारक पेट्रोल व डीझेल दरवाढी विरोधात ‘‘जनजागरण अभियान’’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान चर्चगेट, ग्रँटरोड, दादर, बांद्रा, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरीवली, सीएसटी, मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड, भायखळा, शिवडी, सायन, वडाळा, गोवंडी, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, कुर्ला, चेंबूर या प्रमुख रेल्वे स्थानकाबाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते उभे राहून लोकल प्रवाशांना माहिती पत्रक देऊन आणि छोटी सभा घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती देणार आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.
मुंबईमध्येच पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती सगळ्यात जास्त आहे. हा मुंबईकरांवर अन्याय आहे. मुंबईमध्येच सगळ्यात महाग पेट्रोल रुपये ८१/- प्रती लिटर आणि डीझेल रुपये ६८/- प्रती लिटर आणि हि मुंबईकरांची छळवणूक आहे. सगळ्यात जास्त टॅक्स भाजपा सरकार लावत आहे. एक्साइज ड्यूटी, वॅटआणि सेस सर्वात जास्त असल्यामुळे मुंबईकरांना पेट्रोल व डीझेल महाग मिळत आहे. मुंबईकरांनी शिवसेना भाजपला ६ खासदार, ३० आमदार आणि मुंबई महानगरपालिका दिली त्याच मुंबईकरांवर हा खूप मोठा अन्याय आहे. हि मुंबईकरांची लूट आहे असा आरोप निरुपम यांनी केला. भाजपा सरकारने पेट्रोल आणि डीझेलला जीएसटीमध्ये आणले तर पेट्रोल आणि डीझेल मुंबईकरांना अर्ध्या किंमतीत मिळतील. यामुळे मुंबईकरांना खूप मोठा दिलासा मिळेल असेही निरुपम म्हणाले.