मुंबई आणि लंडन शहराच्या नातं अधिकच घट्ट :  वर्ल्ड सिटीज कल्चरल फोरममध्ये मुंबई शहराला सदस्यत्व

लंडन आणि  मुंबईच्या महापौरांनी केल्या स्वाक्षऱ्या

मुंबई : जागतिक सांस्कृतिक मंचमध्ये (वर्ल्ड सिटीज कल्चरल फोरम) मुंबई शहराचा समावेश सदस्य शहर म्हणून करण्यासंदर्भातील कागदपत्रांवर आज मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि लंडनचे महापौर सादिक खान यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय, पर्यटन यांच्यासह इतर विविध क्षेत्रांत मुंबई आणि लंडनमध्ये वाढत्या सहकार्याबद्दल चर्चा झाली. लंडनच्या सहकार्याने मुंबईमध्ये आरोग्य, पर्यटन, चित्रपट, वाहतूक या विविध क्षेत्रातील एकमेकांच्या सहकार्यामुळे दोन्ही शहरांमधील मैत्रीचे नाते अधिक दृढ होईल. तसेच दोन्ही शहरांच्या संबंधामध्ये नवीन अध्याय सुरू होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी केले.

लंडनचे महापौर सादिक खान यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ब्रिटीश उपउच्चायुक्त स्क्रिस्पिन सिमॉन, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता आदी यावेळी उपस्थित होते.   यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई ही सध्या भारताची आर्थिक राजधानी आहे. मात्र, मुंबईला आर्थिक व तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र म्हणून जगाच्या नकाशावर आणण्याचे आमचे ध्येय असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लंडन व मुंबई या दोन्ही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर साम्य आहे.लंडन शहरास मी यापूर्वी भेट देऊन तेथील वाहतूक व्यवस्था व नियंत्रण कक्षाची माहिती घेतली आहे. लंडनच्या वाहतूक व्यवस्थेच्या अनुभवाचा फायदा मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सुरळीत होण्यास नक्कीच मदत होईल. आखीव रेखीव अशा या शहराच्या प्रशासनाकडूनही खूप काही शिकण्यासारखे आहे.  मुंबईतील फिल्म सिटीचा पुनर्विकास करत आहोत. जुने तंत्रज्ञान काढून नवीन आधुनिक तंत्रज्ञानयुक्त फिल्म सिटी तयार करत आहोत. आधुनिक तंत्रज्ञानासाठी तसेच राज्यात सुरू करण्यात येणाऱ्या वैद्यकीय पर्यटनाच्या वाढीसाठी लंडन शहराचे मोलाचे सहकार्य मिळेल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

आपण एकमेकांचे बांधव आहोत :  सादिक खान महापौर लंडन 

लंडनचे महापौर सादिक खान म्हणाले, मुंबई व लंडन ही जुळी शहरे आहेत. लंडनप्रमाणेच मुंबई सुद्धा आर्थिक, व्यापारी केंद्र आहे. लंडनमध्ये अनेक भारतीय नागरिक राहतात. तर लंडनचे उपमहापौर हे भारतीय वंशाचे आहेत. त्यामुळे एकमेकांचे बांधव आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्मार्ट सिटीची संकल्पना अतिशय चांगली असून यामध्ये सहकार्य करण्यास आनंद होईल. लंडनमध्ये चित्रपटांच्या निर्मितीसाठी असलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा बॉलिवूडला होईल. भारतातील पाच शहरांच्या दौऱ्याची सुरूवात मुंबईतून करताना आनंद होत असल्याचे ते म्हणाले. उपउच्चायुक्त सिमॉन यांनी वैद्यकीय तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, आर्थिक व तांत्रिक आदी क्षेत्रात लंडन सहकार्य करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!