स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूरमध्ये भव्य थीम पार्क आणि संग्रहालय उभारणार.
मुंबई, दिनांक ३१ मार्च: महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागामार्फत आगामी काळात मान्सून धमाका हा अभिनव उपक्रम राबवला जाणारा असून, यंदा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला आठ कोटी रुपयांचा नफा देखील मिळाला आहे. विभागाच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.
यापूर्वीच्या काळात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला एवढा नफा कधीच झालेला नसून, ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा आठ कोटींचा नफा झालेला आहे. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विविध प्रकल्पांमुळे हे होऊ शकले आहे. आजवर सतत तोट्यात असलेल्या विभागाला नफा मिळवून देण्याचे काम यंदा झालेले आहे.
त्याचप्रमाणे पर्यटन विभागामार्फत ‘वीरभूमी परिक्रमा’ अंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त २१ मे ते २८ मे २०२३ दरम्यान विचार जागरण सप्ताह आयोजित केला जाणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.
यावेळी मंत्री लोढा म्हणाले की, “पर्यटन विभागामार्फत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत हे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूरमध्ये भव्य थीम पार्क आणि संग्रहालय उभरण्यात येणार आहे. तसेच २१ मे ते २८ मे दरम्यान विचार जागरण सप्ताह आयोजित केला जाणार आहे.”
या कालावधीत अभिवादन यात्रा, लिटरेचर फेस्टिव्हल, गीत वीर विनायक, वीरता पुरस्कार महानाट्य, कौतुक सोहळा आणि किर्तनसेवा कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
नाशिक येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर आणि नाशिकमध्ये त्यांच्या क्रांतिकारी उपक्रमांची सुरुवात असून, त्यांनी अभिनव भारताची स्थापना केली. सांगली येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर काही काळ वास्तव्यास होते आणि तेथेच त्यांचे निधन झाले, तेथे त्यांचे स्मारक आहे. पुणे येथे स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाविद्यालयीन शिक्षणासाठी होते आणि परदेशी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यासाठी परदेशी कपड्यांची होळी केली. मुंबई येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आयुष्याच्या शेवटच्या वर्षात राहिले. वैचारिक आणि साहित्यिक दृष्टिकोनातून, येथेच सावरकर सदन मध्ये त्यांनी आत्मार्पण केले. त्यामुळे या सर्व ठिकाणी जयंती सप्ताहाच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.