MPSC trainees met Sharad Pawar!

विद्यार्थ्यांनी इतर मार्गही शोधले पाहिजेत, पवारांनी दिला सल्ला

मुंबई दि. २४ फेब्रुवारी – एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. “आमच्या मागण्यांना, आंदोलनाला पाठिंबा देत आमच्यामागे खंबीरपणे उभे राहिलात. रात्री ११ वाजता आमच्या आंदोलनस्थळी भेट देऊन आमच्या व्यथा जाणून घेतल्या, याबद्दल आपले आभार मानण्यासाठी आम्ही आज तुमच्या भेटीला आलोय”, असं परीक्षार्थींनी पवार यांना सांगितलं. प्रशिक्षणार्थींशी संवाद साधताना त्यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत पवारांनी मार्गदर्शन केले. “तुम्ही सरकारी नोकरीत जाऊ इच्छिता, ही चांगली बाब आहे. पण त्यासोबत विद्यार्थ्यांनी इतर मार्गही शोधले पाहीजेत असा सल्लाही दिला.

एमपीएससी परीक्षेच्या नव्या पेपर पॅटर्नविरोधात आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या अखेर एमपीएससी आयोगाने मान्य केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आंदोलनाला बसलेल्या परीक्षार्थींच्या लढयाला यश आलं आहे. एमपीएससी मुख्य परीक्षांमध्ये नवा पॅटर्न २०२५ पासूनच लागू होईल, असा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिला. परीक्षार्थींना पाठिंबा देण्यासाठी दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार रात्री ११ वाजता पुण्यातील आंदोलनस्थळी गेले. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आंदोलनस्थळावरुन पवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करुन या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची सुचनला केली होती. मुख्यमंत्र्यांनीही एमपीएससी आयोगाला पत्र लिहिलं. त्यानंतर एमपीएससीने ट्विट करुन विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्याचं सांगितलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

विद्यार्थ्यांनी इतर मार्गही शोधले पाहीजेत

पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करत असताना आपली स्पर्धा परिक्षेत निवड होऊ शकत नाही, असे वाटल्यानंतर काही विद्यार्थी पुण्यातच चहाचा व्यवसाय सुरु करतात, अशी भावना एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर बोलून दाखविली. त्यानंतर शरद पवार म्हणाले, “तुम्ही सरकारी नोकरीत जाऊ इच्छिता, ही चांगली बाब आहे. पण त्यासोबत विद्यार्थ्यांनी इतर मार्गही शोधले पाहीजेत. एमपीएससी शिवाय अनेक पर्याय आहेत, तिथे विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला हवे आहेत. स्टार्टअपसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा”, असा सल्ला शरद पवार यांनी दिला.

तुम्ही मला म्हातारा समजता का ? पवारांच्या वक्तव्यावर विद्यार्थ्यांमध्ये हशा ..

“आपण रात्री ११ वाजता आम्हाला भेटलात. या वयातही आपण तब्बल ४० मिनिटे उभे होतात. आमच्या व्यथा जाणून घेतल्या. इतर पुढारी पुण्यातील कसब्यात प्रचाराला आले अन् तिथून आमच्याकडे आले. आपण एकमेव होतात ज्यांनी फक्त आमच्यासाठी वेळ दिलात. आपले खरोखर आभार…”, अशा भावना परीक्षार्थींनी शरद पवार यांच्याकडे व्यक्त केल्या. त्यावर पवारांनी मिश्किल शैलीत विद्यार्थ्यांची फिरकी घेतली. “माझी तुम्हा सगळ्यांकडे एक तक्रार आहे. या वयातही… असं आपण पुन्हा पुन्हा म्हणता…. आपण मला काय म्हतारा समजता का…?” असं पवार म्हणताच विद्यार्थ्यांमध्ये खसखस पिकली. यावेळी पवारांनाही हसू अनावर झालं.

भाजपवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे दिली. मतदार कुठे गेले असतील तर त्यांनी निवडणुकीसाठी यावे, असे आवाहन करण्यात चुकीचे नाही. जर मतदार नसेल तर त्यासंबंधी हरकत घेणे योग्य आहे. एखाद्याच्या भाषणावर हरकत घेणे म्हणजे कळत-नकळतपणे त्याला जातीय रंग देण्याचा हा प्रयत्न आहे असा थेट हल्लाबोल शरद पवार यांनी भाजपने घेतलेल्या आक्षेपावर केला. ज्यावेळी यशासंबंधी शंका तयार होते तेव्हा जात,पात,धर्म या चुकीच्या गोष्टींकडे आपला प्रचार वळवण्याचे काम भाजपसाठी नवे नाही. यापूर्वीही असे अनेकदा झाले आहे याची आठवणही शरद पवार यांनी करुन दिली.

कापूस आणि सोयाबीन या दोन क्षेत्रांची स्थिती अतिशय गंभीर आहे. सगळ्यांच्या घरात कापूस आहे, मात्र मार्केट नाही, आयात सुरू आहे. सोयाबीन, कांद्याची स्थितीही अशीच आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून याबाबत पावले टाकली जात नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचे परिणाम दिसतील असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. सरकार चालवून लोकांना विश्वास देणे आणि विकासाच्या कामाला गती देणे, असे कोणतेही काम सरकारकडून होत नसल्यामुळे इतर गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी विविध विषय काढले जातात असा थेट आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!