केडीएमटीमधून दिव्यांगांना लवकरच विनामूल्य प्रवास
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन
डोंबिवली : बेस्ट आणि टीएमटीच्या धर्तीवर केडीएमटीमधूनही दिव्यांगांना विनामूल्य प्रवासाची सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी दिव्यांग सहायता शिबिरात दिले. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शिबीरात जवळपास सव्वा दोन हजार लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
केंद्र सरकारच्या केंद्रीय सामाजिक न्याय खात्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या मदतीने खासदार शिंदे यांनी या शिबिरांचे आयोजन केले होते. समाजात वावरताना दिव्यांगांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जीवनावश्यक साधने घेणे देखील पैशांअभावी अनेकांना परवडत नाहीत त्यामुळेच या शिबीराचे आयोजन केल्याचे खासदारांनी सांगितले. शिंदे यांच्या खासदार निधीतून अंबरनाथ येथील प्रवीण जोशी, डोंबिवली येथील दत्तात्रय सांगळे आणि उल्हासनगर येथील मंगल उल्बी या दिव्यांगांना तीन चाकी स्कूटर खा. डॉ. शिंदे यांच्या हस्ते देण्यात आली; तसेच, कळवा येथील शरद पवार आणि दिवा येथील संतोष वानखेडे यांना कृत्रिम पाय बसवण्यात आला. ‘क्षितीज’ या विशेष मुलांच्या शाळेतील ३८ विद्यार्थी आणि ‘संवाद’ या कर्णबधिर मुलांच्या शाळेतील ७ विद्यार्थ्यांनी देखील या शिबिराचा लाभ घेतला. या विद्यार्थ्यांना विशेष मुलांसाठी मेंदूचा विकास करणारे विशेष गेम्स आणि व्यायामासाठीचे साहित्य यांचा समावेश असणारे एमआर आणि सेंसरी किट देण्यात आले. रविवार १५ ऑक्टोबर रोजी खिडकाळेश्वर मंदिर, खिडकाळी व झमझम हॉल, खडी मशीन रोड, कौसा-मुंब्रा या ठिकाणी ही शिबिरे होणार आहे. त्याचा लाभ दिव्यांनी घ्यावा असे आवाहनही शिंदे यांनी केले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, नगरसेवक दीपेश म्हात्रे,केडीएमटी सभापती संजय पावशे, महिला आघाडी जिल्हा संघटक विजया पोटे, तसेच, नगरसेवक महेश गायकवाड, सुशिला माळी, शीतल मंढारी, माधुरी काळे, उपशहरप्रमुख शहर पाटील, संजिता गायकवाड, शहर संघटक कविता गावंड, उपशहरप्रमुख संतोष चव्हाण, किशोर मानकामे आदी उपस्थित होते.
….