लाखो प्रवाशांच्या जीवाशी खेळ : रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा : खा. डॉ. श्रीकांत शिंदे
मुंबई – मुंबई उपनगरी रेल्वेवर वारंवार रुळ तुटण्याचे प्रकार होत असून लाखो प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या रुळांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या गँगमनसह सुरक्षितताविषयक अन्य कर्मचाऱ्यांच्या तब्बल १८६७ जागा रिक्त असून त्या त्वरित भरण्याची आग्रही मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी लोकसभेत केली. तसेच, मानखुर्द जवळ तडे गेलेल्या रुळांवरून लोकल चालवून प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
मुंबई उपनगरी रेल्वेवर दिवसाला किमान ८० लाख प्रवासी प्रवास करतात. गेल्या काही काळात उपनगरी रेल्वे मार्गावर रुळांना तडे जाण्याचे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे रेल्वे सेवा वरचेवर विस्कळित होते. प्रवाशांच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी मंगळवारी लोकसभेत सरकारच्या निदर्शनास आणून दिले. अलिकडेच मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ रुळाला तडा गेला असताना केवळ कापडाचा तुकडा रुळाला बांधून लोकल चालवली गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्याचाही दाखला खा. डॉ. शिंदे यांनी दिला.
मध्य रेल्वेवर गँगमनच्या ३,१९७ जागा मंजूर असून केवळ २०३० जागा भरल्या आहेत, तर सुरक्षितताविषयक अन्य कर्मचाऱ्यांच्या ३४५८ जागा मंजूर असून केवळ २७५८ जागांवर भरती झाली आहे. त्यामुळे एकूण १८६७ जागा रिक्त असून ८० लाख प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार ताबडतोब बंद झाला पाहिजे. त्यासाठी गँगमन आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा ताबडतोब भरा, अशी आग्रही मागणी खा. डॉ. शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली