दिल्ली :  ‘गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा’, अशी उबाठाची अवस्था झाली आहे. मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा अशी याचना करण्यासाठी मशाल प्रमुख दिल्लीत आले असतील. सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी त्यांना ताटकळावे लागत आहे. जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत येतात, तेव्हा तुम्ही टीका करतात. बाळासाहेबांनी काँग्रेस गाडण्याची भाषा केली होती आणि सोनिया गांधी यांचे हिंदुस्थानासाठी योगदान काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. कदाचित आज सोनिया गांधी यांना भेटून त्यांची माफी मागतील आणि माझा बाळासाहेबांच्या वक्तव्याशी संबध नाही, असे सांगायला उद्धव ठाकरे आले असतील, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.  

शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्लीत मविआ नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी दाखल झाले आहेत. ठाकरे यांच्या दिल्ली भेटीवर खासदार म्हस्के यांनी टीका केली आहे. म्हस्के म्हणाले,   यापूर्वी दिल्लीतील नेते मातोश्रीवर यायचे परंतु यांना दिल्लीत जावे लागते ही लाजिरवाणी बाब आहे. महाराष्ट्रात पूर परिस्थिती आहे. पुण्यात त्यांनी मोठं भाषण केले होते. परंतु पूरग्रस्तांना भेटण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. त्याऐवजी फेसबुकवरुन जरी त्यांनी पाहणी केली असती तरी खूप काही झाले असते मात्र आता त्यांना तेही जमणार नाही. बाळासाहेबांचा मराठी बाणा त्यांच्यात आहे हे उसने अवसान दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा हा ‘याचना दिल्ली दौरा’ आहे असे म्हस्के म्हणाले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *