कल्याण, बदलापूर, टिटवाळा रेल्वे स्थानकात
पादचारी पूल, सरकत्या जिन्यांना मंजुरी
कल्याण : प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे मध्य रेल्वेवरील कल्याण, बदलापूर, टिटवाळा, वांगणी या स्थानकावर प्रवाशांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता सदर रेल्वे स्थानकांवर नविन पादचारी पूलाला मंजुरी देण्यात आली असून, त्याचबरोबर कल्याण, बदलापूर आणि टिटवाळ्यात सरकते जिने (एस्कलेटर्स) बसविण्यात बसविण्यास रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे.
एल्फिन्स्टन रोड येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार कपिल पाटील यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय व्यवस्थापक अगरवाल यांची भेट घेतली. कल्याण रेल्वे स्थानकाबरोबरच बदलापूर, टिटवाळा येथील प्रवाशांच्या वाढत्या संख्येकडे खासदार कपिल पाटील यांनी या बैठकीत लक्ष वेधले. त्यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शर्मा यांनी कल्याण, टिटवाळा, बदलापूर, वांगणी येथे नवे पादचारी पूल उभारण्याबरोबरच कल्याण, बदलापूर आणि टिटवाळा येथे एस्कलेटर्स बसविण्याचा निर्णय जाहीर केला.
दरम्यान, मंजुरी मिळालेल्या बदलापूर येथील होम प्लॅटफॉर्मचे काम वेगाने करण्याचे आदेशही यासंगी देण्यात आले. प्रवाशांच्या सोयीसाठी बदलापूर, कसारा आणि खडवली येथील पादचारी पूलाचे काम लवकारत लवकर पूर्ण करण्याच्या सुचनाही रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या.
टिटवाळा येथील तिकीट खिडकीची वेळ सकाळी आठपासून रात्री नऊपर्यंत करावी, भिवंडी रेल्वे स्थानकात सर्व मेल-एक्सप्रेस गाड्यांना दोन मिनिटांचा थांबा द्यावा, अशी मागणीही खासदार कपिल पाटील यांनी केली. त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन मध्य रेल्वे प्रशासनाने दिले.
कसारा येथे गाड्यांचे थांबे पूर्ववत करा
मध्य रेल्वे प्रशासनाने १ ऑक्टोबरपासून लागू केलेल्या वेळापत्रकात कसारा रेल्वे स्थानकात पुष्पक एक्सप्रेस, गीतांजली एक्सप्रेस, पाटलीपूत्र एक्सप्रेस, गोदान एक्सप्रेससह काही गाड्यांना थांबा होता. त्यामुळे मुंबई व नाशिककडे जाणाऱ्या हजारो नोकरदार व व्यावसायिकांची सोयीचे होत असे होत. रेल्वेने अचानक हे थांबे रद्द केल्याने प्रवाशांचे हाल सुरु झाले होते. या गाड्यांना पूर्ववत थांबे देण्याची मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.