ठाणे – दिवा दरम्यान पाचव्या व सहावी मार्गिका फेब्रुवारी २०२२ पर्यंत सुरु होणार
खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडून पाहणी दौरा

ठाणे ०४ सप्टेंबर : ठाण्यापुढील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ठाणे व दिव्यादरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले असून सदर प्रकल्प फेब्रुवारी २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाण्यापुढील प्रवाशांसाठी लोकलच्या फेऱ्या मोठ्या संख्येने वाढवता येणे शक्य होणार असून त्यामुळे गर्दीचा ताण हलका होईल, असा विश्वास खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. हे दोन्ही मार्ग पूर्ण झाल्यावर लोकलच्या तब्बल २५ ते ३० गाड्या वाढतील. तसेच अप मार्गासाठी २, डाऊन मार्गसाठी २ आणि एक्स्प्रेससाठी २ असे स्वतंत्र रेल्वेमार्ग उपलब्ध होणार असल्याने लोकल प्रवासाची गती वाढण्यासही मोठी मदत मिळणार असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.

कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेच्या सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आज पाहणी दौरा करीत आढावा घेतला. विशेष म्हणजे या पाहणी दौऱ्यादरम्यान खासदार डॉ. शिंदे यांनी लोकलच्या गार्डच्या डब्यातून प्रवास केल्याचे दिसून आले. कोपर रेल्वे स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मच्या कामासह इतर विठ्ठलवाडी व अंबरनाथ स्थानक येथे सुरु असलेल्या महत्वाच्या कामांचीही त्यांनी आज पाहणी केली.

खारेगाव रेल्वे फाटक कायमचे बंद होणार ..
कळवा पूर्व – पश्चिम प्रवासाकरिता अत्यंत महत्वाचा असलेल्या या खारेगाव आरओबी चे प्रगतीपथावर असून येत्या दीड महिन्यामध्ये या पुलाचे काम पूर्ण होऊन नागरिकांकरिता खुला होणार असून यासंदर्भात संबधित रेल्वे अधिकाऱ्यांना तातडीचे महत्वपूर्ण सूचना खा.डॉ. शिंदे यांचेमार्फत देण्यात आल्या. सदर उड्डाणपूल कार्यान्वित झाल्यानंतर खारेगाव येथील रेल्वे फाटक कायमचे बंद होईल. त्यामुळे उपनगरीय रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या वाढत रेल्वे सेवा अधिक गतिमान होईल व रेल्वे प्रवासांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल. तसेच अपघातांचे प्रमाण देखील कमी होईल आणि सद्यस्थितीत रेल्वे फाटकामुळे खारेगाव परिसरात होणारी वाहतूककोंडी च्या समस्येतून कळवा, विटावा, खारेगाव परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल.

कोपर होम प्लॅटफॉर्म १५ दिवसात पूर्ण
कोपर स्टेशनवर होम प्लॅटफॉर्म असावा अशी मागणी प्रवाशांकडून गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात केली जात होती. त्यासाठी आपण पाठपुरावा करून हे काम मंजूर करून घेतले, आणि आता या होम प्लॅटफॉर्मचे काम अंतिम टप्प्यात आले असून वीज पुरवठ्यासह इतर छोटी मोठी कामे येत्या १५ दिवसात पूर्ण होतील. हा होम प्लॅटफॉर्म पुर्ण झाल्यावर पलीकडे राहणाऱ्या लोकांना मोठी कनेक्टिव्हिटीही निर्माण होणार असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. त्यासोबतच कोपर स्टेशनवर ठाण्याच्या दिशेला एफओबीचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. अप्पर कोपरचा अस्तित्वात असणारा ब्रिज अरुंद असून आतापेक्षा दुप्पट मोठ्या पुलाचे काम या कामही मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासोबतच कोपर स्टेशनबाहेरून कल्याण रिंगरोडसाठी जोडरस्त्याची मागणी करण्यात येत असून त्यादृष्टीनेही नक्कीच प्रयत्न केले जाणार असल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

विठ्ठलवाडी स्थानकात देखील नागरिकांकडून अनेक सुविधांसाठी मागण्या येत होत्या त्यांचा पाठपुरावा करून, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात पूर्वेला तिकीट घर उपलब्ध नव्हते ते पाठपुरावा करून येत्या एका महिन्यात नागरिकांसाठी उपलब्ध होईल. तसेच पूर्व पश्चिम दोन्ही बाजूला लिफ्ट उपलब्ध करून दिली. विठ्ठलवाडी पासून पुढे तिसऱ्या व चौथ्या मार्गीकेचे लवकरच काम सुरु होणार असून सद्यस्थितीत या मार्गीकेसाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन सुरु आहे, त्याचे हि प्रत्यक्षात काम लवकरच सुरु होईल. तिसऱ्या आणि चौथ्या मार्गीकेचे रेखांकन झाल्यानंतर पूर्वेकडून पश्चिमेला उतरणाऱ्या (FOB) चे काम रेल्वेकडून लवकर सुरु करण्यात आली. तसेच येत्या २० दिवसात विठ्ठलवाडी स्थानकात सरकते जिने हि नागरिकांसाठी उपलब्ध होतील अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत यांनी दिली.

अंबरनाथ स्टेशनचे काम प्राचीन शिवमंदिराप्रमाणेच
प्राचीन शिवमंदिरच्या धर्तीवर अंबरनाथ स्थानकाचे पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण करण्यात यावे याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय रेल्वे राज्य मंत्र्याकडे मागणी केली होती, त्याअनुषंगाने आज प्रत्यक्ष खा.शिंदे यांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकाची पाहणी केली. अंबरनाथ रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण देखील प्राचीन शिवमंदिर सारखेच करण्यात यावे, जेणेकरून हा दैदिप्यमान वारसा जीवंत राहील आणि पर्यटनास अधिकची चालना मिळेल. त्यामुळे या प्रमाणेच रेल्वे स्थानकाचे काम कलात्मक होणे अपेक्षित आहे. यासाठी स्थापत्य, आणि वास्तुकलेवर आधारित अशी स्टेशनची रचना करण्यात येईल. त्याचबरोबर अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यान चिखलोली स्थानक होण्याकरिता जागा अधिग्रहण करण्याचे काम सुरु असून यामध्ये जिल्हाधिकारी, प्रांत, स्थानिक प्रशासन सहभागी असून जागा अधिग्रहण करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच चिखलोली स्थानकाचे काम सुरु करण्यात येईल व या स्थानकामुळे स्थानिक नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असून यासाठी मी स्वतः विविध स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर पाहणी दौऱ्यादरम्यान अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक आशुतोष गुप्ता, MRVC चे प्रोजेक्ट मॅनेजर बी.के.झा यांच्यासोबत ठाणे मनपा महापौर नरेश म्हस्के, मा. उपमहापौर रमाकांत पाटील, नगरसेवक शैलेश पाटील, उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ क.डों.म.पा. नगरसेवक रमेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, युवसेनेचे सागर जेधे व उल्हासनगर शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, डीआरयुसीसी सदस्य सुभाष साळुंखे व खासदार रेल्वे समन्वय समिती सदस्य, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *