खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन : ग्रामस्थांसोबत साजरी केली दिवाळी

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी दिवाळीच्या मुहूर्तावर इर्शाळवाडी येथील ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी सर्व स्थानिक ग्रामस्थांसमवेत आणि तेथील लहान बालकांसमवेत त्यांनी दिवाळी साजरी केली. सर्व नागरिकांना दिवाळीनिमित्त विविध भेट वस्तूंचे वाटपही करण्यात आले. खासदार डॉ. शिंदे यांनी लहान मुलांसमवेत फराळाचा आस्वाद घेतला. याचबरोबर त्यांच्यासमवेत फटाके फोडण्याचाही आनंद घेतला. आपले सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इर्शाळवाडी येथील ग्रामस्थांचे पुनर्वसनाचे काम गतीने सुरू आहे. यामुळे इर्शाळवाडी वासियांची यंदाची दिवाळी जरी तात्पुरत्या निवाऱ्यात साजरी होत असली तरी पुढील दिवाळी तुमच्या हक्काच्या आणि सुरक्षित घरात साजरी केली जाईल, असा विश्वासही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

जुलै महिन्याच्या अखेरीस रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळण्याची घटना घडली. या दुर्घटनेत अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला. यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली तर अनेक बालकांचे कुटुंबछत्र हरपले. या कुटुंबांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षित निवाऱ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना गतीने राबविण्यात येत आहे. या कालावधी दरम्यान दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करून देण्यात आली. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः भेट देत पाहणी देखील केली आहे. याच बरोबर नागरिकांसाठी सर्व सुविधा देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या दुर्घटनेमध्ये आपले सर्वस्व गमावलेल्या ग्रामस्थांची दिवाळी आनंदाची व्हावी यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी इर्शाळवाडीला रविवारी भेट दिली. या ठिकाणी उपस्थित राहुन त्यांनी तेथील बालकांसमवेत दिवाळी सण साजरा केला. त्यांचा सोबत हितगुज करत फराळाचा आस्वाद घेतला. तसेच लहानग्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या समवेत फटाकेही फोडले. सर्वांना दिवाळी निमित्त आनंदाच्या शिदोरीचे वाटप केले. यामध्ये नागरिकांना विविध भेटवस्तू, फराळ तसेच बालकांना विविध उपयोगी साहित्य या सर्वांचे वाटप केले. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसून येते होते.

हक्काचे घर लवकरच !

या दुर्घटनेने कुटंब छत्र हरपलेल्या बालकांचा आधार बनून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. या बालकांच्या शिक्षणाचा सर्व खर्च शिवसेनेच्या आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून उचलण्यात आला आहे. यंदाची दिवाळी जरी या नागरिकांची तात्पुरत्या निवाऱ्यात साजरी होत असली तर पुढील दिवाळी ही त्यांच्या हक्काच्या घरात साजरी होईल अशी ग्वाही यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सर्व ग्रामस्थांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *