बुलेट ट्रेनसाठी लाखो कोटी, पुलासाठी रेल्वेचा ठेंगा 

….तर एल्फिन्स्टनची दुर्घटना टाळता आली असती
मुंबई : एल्फिन्स्टन आणि परळ येथे १२ मीटर रुंद पादचारी पुल बांधण्याची मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सुमारे दीड वर्षांपूर्वीच केली होती. मात्र तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी निधी नसल्याचं कारण दिलं होतं. पुलाचा प्रश्न मार्गी लागला असता तर एल्फिन्स्टनची दुर्घटना टाळता आली असती व २२ लोकांचे प्राण वाचू शकले असते असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे या दुर्घटनेला रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. बुलेट ट्रेनसाठी लाखो कोटी, पुलासाठी रेल्वेने ठेंगा दाखवल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पुलावर मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे अरूंद पुलाचा प्रश्न समोर आला आहे. या अरूंद पुलाविषयी खासदार सावंत यांनी रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला होता. परळ- एल्फिन्स्टन भागात अनेक कार्यालये सुरु असून याशिवाय केईएम, टाटा यासारख्या महत्त्वाच्या रुग्णालयात जाण्यासाठीही हेच स्टेशन जवळचे आहे. त्यामुळे अशा महत्त्वाच्या स्टेशनवरील पुल रुंद आणि प्रशस्त असणे गरजेचे आहे असे निदर्शनास आणून दिले हेाते. मात्र तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी जागतिक मंदीमुळे निधी नसल्याचं कारण दिलं होतं. पण सावंत यांच्या पत्राची दखल घेत प्रशासनाने या पुलासाठी पैसे उपलब्ध केले असते तर आज २२ प्रवाशांचा जीव वाचला असता अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *