मुंबई : ३० लाखांवरील रकमेच्या सर्वच गुन्ह्यांत आता ईडी तपास करणार असल्याची माहिती मिळत आहे. कुठलाही गुन्हा दाखल असल्याशिवाय ईडीला स्वत:हून कारवाई करता येत नाही. मात्र, दाखल गुन्ह्यांत ३० लाखांपेक्षा अधिक रकमेचा समावेश असेल तर ईडीला अशा गुन्ह्यांची चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासाधिन असलेल्या ३० लाख रुपये किंवा त्यावरील रकमेबाबत दाखल गुन्ह्यात ईडीने आता कारवाई सुरू केली आहे.
मुंबई पोलिसांकडे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत ईडी स्वत:हून कारवाई करीत नव्हते. परंतु अलीकडे काही प्रकरणात रोख रकमेचा व्यवहार मोठ्या प्रमाणात झाल्याची बाब पुढे आल्यानंतर ईडीने स्वत:हून चौकशी सुरू केली होती. त्यानुसार गुन्हा (ईसीआयआर) दाखल करून कारवाई सुरू केली होती.
राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल असलेल्या गुन्ह्यांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये आता ईडी कारवाई करणार असल्याची माहिती मिळत आहे. एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यात रोखीचा संशयास्पद व्यवहार ३० लाखांपेक्षा अधिक झाला असल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणेने ईडीला कळवणे आवश्यक आहे. त्यानंतर ईडीमार्फत चौकशी करून नंतर काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली जाते.
याशिवाय दाखल गुन्हा वा आरोपपत्रात अशी माहिती आढळली तरी त्याबाबत चौकशी करण्याचे अधिकार ईडीला आहेत. त्या दृष्टीने संचालनालयाने अनेक प्रकरणात चौकशी सुरु केली आहे. मात्र या चौकशीत काळा पैसा आढळला तरच गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जात असल्याची माहिती मिळत आहे.