संपादक बाबा देशमाने, दत्तात्रय नरनाळे यांना मूकनायक सन्मान प्रदान !

माजलगाव : सध्याचे राजकीय वातावरण पाहता लोकशाही टिकवण्याची जबाबदारी पत्रकारांवरच आहे. त्यामुळे व्यवस्थेविरोधात आवाज उठविण्यासाठी पत्रकारांची एकजूट असली पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक राही भिडे यांनी केले. माजलगाव येथे गुरूवार (दि,१८ रोजी) मूकनायक आणि माजलगाव भूषण सन्मान सोहळा पार पडला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.

माजलगाव एकता पत्रकार संघाच्यावतीने वैष्णवी मंगल कार्यालयात मूकनायक आणि माजलगाव भूषण सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, माजी आमदार मोहनराव सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रविकांत राठोड, भाजपा नेते रमेश आडसकर, पत्रकार भागवत तावरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना राही भिडे म्हणाल्या की, माध्यमांवर जी बंधने येत आहेत, त्याचा सर्व पत्रकारांनी एकजुटीने सामना केला पाहिजे. व्यवस्थेविरोधात आवाज उठविण्यासाठी पत्रकारांनी एकजूटीने उभं ठाकले पाहिजे. तरच भारतीय संविधान आणि लोकशाही टिकून राहिल. सध्या लोकशाहीवर बालंट आलं आहे, ते दूर करणं पत्रकारांच्या हातात राहिलेले नाही. आवाज दाबण्याचे काम सुरू आहे. मात्र या मिशनमध्ये आपण एकटेच नसून सगळेजण आहेत. त्यामुळे पत्रकारांनी घाबरण्याचे कारण नाही. पत्रकारांची एकजूट असेल तर लोकशाहीला कोणताही धोका नाही असेही मत भिडे यांनी व्यक्त केले.

आमदार संदीप क्षीरसागर आपल्या भाषणात म्हणाले की , पत्रकारिता हा व्यवसाय नसून ते व्रत आहे. पत्रकारच समाजाचा खरा आरसा आहे. लोकप्रबोधनाबरोबरच राजकरण्यांना योग्य दिशा देण्याचे कामही पत्रकार करत असतात. यावेळी वसंत मुंडे बाबा देशमाने यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक तथा माजलगाव एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्योतिराम पांढरपोटे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गिरी यांनी केले.

वसंत मुंडे म्हणाले, पत्रकारांनी वंचितांचा आवाज बनावे. सामान्य माणसांची प्रश्न समजून घेत त्यावर पत्रकारांनी आवाज उठवण्याची खरी गरज आहे.

बाबा श्रीहरी देशमाने म्हणाले की, समाजातील शेवटच्या घटकांचे प्रश्न मांडणारा पत्रकारच असतो. सामाजिक आंदोलने उभी करण्याचे सामर्थ्य केवळ पत्रकारांमध्येच असते. राज्य, देश पातळीवर अनेक सन्मान मिळाले, मात्र माझ्या मातीतला हा सन्मान माझ्यासाठी खुप मोलाचा असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

या मान्यवरांचा सन्मान

आरोग्यदूतचे संपादक बाबा श्रीहरी देशमाने, दै. मराठवाडा पत्रचे संपादक दत्तात्रय नरनाळे यांना मान्यवरांच्या हस्ते मूकनायक सन्मान प्रदान करण्यात आला.तर माजलगाव भूषण पुरस्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितीनराव नाईकनवरे, ॲड. भानुदास डक, रविंद्र कानडे, रामराजे रांजवण, डॉ. गणेश आगे, सरपंच सिमाताई सोळंके, इम्रान ताहेर सलीम खान, तलाठी सुर्यकांत गवई, ग्रामसेवक महेश गेंदले यांना प्रदान करण्यात आला.

तसेच अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकजकुमार वसंतराव जावळे, यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्याचे तहसीलदार डॉ. शिवाजी रामेश्वर मगर आणि परळी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागात सहायक अभियंता-श्रेणी-२ म्हणून कार्यरत असलेल्या दीपाली गिते यांना ही विशेष गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *