शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावणार !
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 41,243.21 काटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या असून त्यामध्ये जलजीवन मिशन, नमो शेतकरी महासन्मान योजना आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावणार असेच चित्र आहे. तसेच ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीला अर्थसाह्य देण्याकरिता एक हजार कोटींची मागणी करण्यात आली आहे.
पावसाळी अधिवेशनात 41,243 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या 35,883.22 कोटी रुपयांच्या आहेत. यामध्ये पाण्याच्या शोधाला महत्व देण्यात आला आहे. ग्लोबल वार्मिंगच्या परिणामी राज्याचे राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. त्यातच अलनिनोच्या प्रभावाने पावसाचे प्रमाणही व्यस्त राहणार आहे. परिणामी जलजीवन मिशन सर्वसाधारण घटक व गुणवत्ता संनियंत्रण व सर्व्हेक्षणासाठी 5856 कोटींची मागणी करण्यात आली आहे. त्या खालोखाल शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या महासन्मान निधी योजनेसाठी मागणी करण्यात आली आहे. अजूनपर्यंत केंद्राकडून शेतकऱ्यांना महासन्मान निधी देण्यात येत असे. मात्र शेतकऱ्यांचे हित म्हणून राज्यानेही केंद्राइतकात आपला हिस्साही जाहीर केला आहे. त्यामुळे प्रधान मंत्री किसान सनिमान निधी योजनेतील सद्यस्थितीतील पात्र लाभार्थींना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यासाठी 4000 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तसेच राज्यातील अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची थकबाकी व चौथा हप्ता देण्यासाठी साडेतीन हजार कोटी (3,563 कोटी) रुपयांची मागणी करण्यात आली आहे. ही रक्कम वेळीच मिळाल्यास शिक्षक, शिक्षकेतर करमचाऱ्यांचा गणेशोत्सव आनंदात जाणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांसाठी जीवनवाहिनी असलेल्या एसटीसाठी अर्थसाह्याकरिता 1000 कोटींची मागणी करण्यात आली आहे.