नाशिक : महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये विराट सभा पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मोदीजी तुम्ही ४ जूननंतर पंतप्रधान नसाल. तुम्ही पंतप्रधान नसाल तेव्हा पीएम केअर फंडचं काय करणार आहात ? कुणाच्या हातात तो देणार आहात ? तेही सांगून टाका, असं सांगतानाच तुम्ही पंतप्रधान होत नाही. मला भाजपची चिंता वाटते. कारण दोन वर्षानंतर तुम्ही झोळी लटकवून निघून जाल. तेव्हा भाजपची अवस्था काय होईल? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
नकली सेना निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर उत्तर दिलं. गेली ३० वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो. तुमच्याकडून दगाफटका खाऊनही आम्ही तुमच्यासोबत राहिलो. तरीही आम्ही भाजपमध्ये गेलो नाही. तर काँग्रेसमध्ये कसे जाणार? असा सवाल करतानाच जोपर्यंत हे समोर बसलेले शिवसैनिक आहेत. तोपर्यंत मला चिंता नाही. तुम्ही भाजपची चिंता करा, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला.
वाजपेयी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकायला निघाले. फक्त बाळासाहेब ठाकरे होते म्हणून तुम्ही वाचलात. बाळासाहेबांनी हस्तक्षेप केला नसता तर तुम्ही राजकीय क्षितीजावर राहिला नसता. आज तुम्ही बाळासाहेबांच्या आशीर्वादाचे हे पांग फेडले? काय वाटत असेल वाजपेयींना, असा खोचक हल्ला त्यांनी चढवला.
विरोधकांकडे पंतप्रधान पदाचे अनेक चेहरे आहेत, अशी टीका आमच्यावर करता. आमच्याकडे चेहरे आहेत. तुमच्याकडे तर चेहराच नाही. दोन वर्षानंतर तुमची अवस्था काय होईल ते पाहा. ५ तारखेलाच अर्धा अधिक भाजप फुटल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर जे उंदीर तुमच्याकडे पळाले त्यांच्या शेपट्या कशा पकडतो ते पाहा, असा इशाराच त्यांनी दिला.