नवी दिल्ली : नरेंद्र मोदी हे तिस-यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नितीन गडकरी पीयुष गोयल यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाचे खासदार प्रतापराव जाधव, आरपीआय पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
२०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे २३ खासदार संसदेत पोहचले होते. मात्र यावेळी महाराष्ट्रात भाजपची चांगलीच पीछेहाट झाली असून राज्यात भाजपचे नऊ खासदार निवडून आले आहेत.
या नेत्यांनी घेतली शपथ
नितीन गडकरी – २०१४ आणि २०१९ च्या दोन्ही मंत्रिमंडळात नितीन गडकरी कॅबिनेट मंत्री होते. रस्ते वाहतूक मंत्रालय त्यांच्याकडे होतं. या नव्या मंत्रिमंडळातही त्यांना संधी मिळाली आहे.
पीयूष गोयल – २०१४ आणि २०१९ या दोन्ही मंत्रिमंडळात पीयूष गोयल हे केंद्रीय मंत्री होते. रेल्वे मंत्रालयासारखं मोठं मंत्रालय त्यांनी सांभाळलं आहे. मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातही पीयूष गोयल यांना संधी मिळाली आहे. गोयल हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारंसघातून विजयी होऊन संसदेत पोहोचले आहेत.
प्रतापराव जाधव – एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची मोदी सरकारमध्ये वर्णी लागली आहे. त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
रक्षा खडसे – रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. रक्षा खडसे या माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या सून आहे.
रामदास आठवले – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांचीही नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. आठवले यापूर्वीच्या दोन्ही मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री होते.
मुरलीधर मोहोळ – पुण्याचे पहिल्यांदाच खासदार बनलेले मुरलीधर मोहोळ यांनाही मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. पहिल्याचवेळी त्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे.
एकनाथ शिंदे, रामदास आठवलेंना धक्का
एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महाराष्ट्रात ७ खासदार निवडून आले आहेत. तरीही त्यांच्या पक्षाला एकही कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. तसेच रामदास आठवले यांना गेल्या सरकारमध्येही राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. यावेळीदेखील त्यांना राज्यमंत्रीपदच देण्यात आलं आहे. त्यामुळे मोदींनी एकनाथ शिंदे आणि रामदास आठवले यांना धक्का दिल्याची चर्चा आहे.
अजित पवार गटाने नाकारलं राज्यमंत्रीपद
महायुतीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटालाही भाजपकडून राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. पण अजित पवार गटाने राज्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली होती. अजित पवार गटाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी हवी होती. पण भाजपकडून त्यांना केवळ राज्यमंत्रीपदासाठी विचारणा करण्यात आली होती. त्यामुळे अजित पवार गटाने ती ऑफर नाकारली. आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा अजित पवार गटाचा विचार केला जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.