…. आणि मंत्रालय १४ मिनिटात रिकामे झाले
मुंबई : वेळ सकाळी साडेअकराची… मंत्रालय नियंत्रण कक्षातून अग्निशमन दल, पोलीस व रुग्णवाहिकेला अपघात झाल्याचा दूरध्वनी गेला आणि अवघ्या पाच मिनिटात अग्निशमन दलाच्या दोन गाड्या मंत्रालयात दाखल झाल्या. याच दरम्यान मंत्रालयातील मुख्य इमारत व विस्तारित इमारत अवघ्या १४ मिनिटांत रिकामी झाली. आपत्तकालीन परिस्थितीत यंत्रणा किती सतर्क आहे यासाठी मॉकड्रील घेण्यात आलं होत. त्यामुळे सगळयांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
सकाळी साडेअकरा वाजता सायरन वाजल्यानंतर मंत्रालय नियंत्रण कक्षातून अग्निशमन दलाला व 108 रुग्णवाहिकेला दूरध्वनी केला गेला. पाच मिनिट 40 सेकंदात अग्निशमन दलाची दोन गाड्या मंत्रालयात दाखल झाल्या. त्यानंतर तिसरी गाडी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या एकूण दोन पथक मंत्रालयात तातडीने दाखल झाली. 108 रुग्णवाहिका मंत्रालयातच उपस्थित असल्याचा संदेश मिळाला. त्याच वेळी संपूर्ण इमारतीत असलेल्या ध्वनीवर्धकावरून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आली. त्यानंतर एकाच वेळी दोन्ही इमारतीतील वरच्या मजल्यावरून ते खालच्या मजल्यापर्यंत अशा क्रमाने उपस्थित अधिकारी व कर्मचारी पायऱ्यांवरून खाली उतरले. 14 मिनिटांमध्ये दोन्ही इमारती संपूर्ण रिकामे झाल्याचे व त्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, दिवे बंद असल्याचा संदेश नियंत्रण कक्षाला मिळाला.
गृहराज्यमंत्री पाय-यावरून खाली उतरले
यावेळी पाचव्या मजल्यावर असलेले गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे स्वतःही पाचव्या मजल्यावरून खाली उतरून आले होते. त्यांनीही या संपूर्ण तालीमीची पाहणी केली. या संपूर्ण कार्यवाही दरम्यान कुठलीही गडबड, गोंधळ न होता हा मॉकड्रिल यशस्वीरित्या पार पडले. इमारत रिकामी करताना करण्यात आलेले नियोजन हे मंत्रालय कोणत्याही आपत्तकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी कधीही सज्ज असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व मॉकड्रिलवर मंत्रालय नियंत्रण कक्षातून गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव व मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ या सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवून होत्या.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *