डोंबिवली : डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाच्या तिघा महिला कर्मचाऱ्यांची लक्षवेधी कामगिरी बजावली आहे. या कर्मचाऱ्यांनी सराईत चोरट्यावर झडप घालून त्याच्याकडून विविध कंपन्यांचे 13 मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. मोहम्मद सादिक उर्फ शमीम (30) असे या चोरट्याचे नाव असून हा चोरटा दिल्लीतील जुनी सीमापुरी भागात राहणारा आहे.


रेल्वे सुरक्षा बलाच्या कॉन्स्टेबल नेहा चौहान, शिवानी पांडे आणि प्रतिभा शर्मा या तिघीही डोंबिवली रेल्वे परिसरात बंदोबस्तासाठी तैनात होत्या. पावणेचारच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्र. 4 वर कर्जत फास्ट लोकलमध्ये सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेकडे सामानाच्या डब्यात गोंधळ सुरू होता. संतप्त प्रवाश्यांनी बेदम चोप दिल्याने एकजण मोठमोठ्याने ओरडत होता. मोठा आवाज ऐकून या कर्मचारी सामानाच्या डब्याकडे धावल्या. तर वरिष्ठ निरीक्षक हरफूलसिंग यादव यांनीही या डब्याकडे धाव घेतली. तोपर्यंत या तिन्ही महिला कॉन्स्टेबल्सनी एका संशयिताला पकडून ठेवले होते. त्यानंतर त्याला काळ्या पिशवीसह खाली उतरवून रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात आणले. वरिष्ठ निरीक्षक हरफुलसिंग यादव यांनी चौकशी केली असता, त्याने स्वतःचे नाव मोहम्मद सादिक उर्फ शमीम असल्याचे सांगितले. या चोरट्याने वेगवेगळ्या गाड्यांमधील प्रवाशांचे मोबाईल फोन आणि बॅग चोरल्याची कबूली दिली. या बॅगची तपासणी केली असता सदर बॅगेत 14 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन सापडले. त्यापैकी एका फोनमध्ये तो फोन स्वतःचा असल्याचे सांगितले, तर उर्वरित 13 मोबाईल चोरीचे असल्याची कबुली चोरट्याने दिली.  रेल्वे सुरक्षा बलाने या चोरट्याला लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी दोन मोबाईलच्या मालकांचा शोध घेतला. मोबाईल मालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोहम्मद सादिक उर्फ शमीम याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस इतर मोबाईलच्या मालकांचाही शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!