मुंबई : सिनेट निवडणुकीसंदर्भात सुरु असणाऱ्या अनागोंदी कारभाराबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक होत आज मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना जाब विचारला. प्रश्नांची उत्तर न देता मुद्द्यांना बगल देणारी कुलगुरुंची मखलाशी ऐकून मनविसे पदाधिकारी आक्रमक झाले. हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य ज्या व्यवस्थेच्या हातात आहे तीच व्यवस्था विदुषकी चाळे करू लागली तर काय करावं याचा निषेध करीत मनसे सरचिटणीस गजानन काळे, अखिल चित्रे, प्रमुख संघटक यश सरदेसाई, चेतन पेडणेकर, सुधाकर तांबोळी, संतोष गांगुर्डे व सहकारी पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत कुलगुरूंना विदूषकाची प्रतिमा भेट दिली.

मुंबई विद्यापीठाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि त्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत नोंदणीकृत पदवीधर गटाच्या सिनेट (अधिसभा) निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम स्थगित केला आहे. १८ ऑगस्ट रोजी विद्यापीठाने कुठलीही पूर्वकल्पना न देता रातोरात निवडणुकीला स्थगिती दिल्याचे परिपत्रक काढले, मात्र शासनाच्या पत्राच्या संदर्भाव्यतिरिक्त या परिपत्रकात निवडणुकीला स्थगिती का देण्यात आली आहे? याबाबत कोणतेही ठोस कारण दिले नाही. अशातच रखडलेल्या मुंबई विद्यापीठाच्‍या सिनेट निवडणुकीचं नवीन वेळापत्रक जाहीर झालं आहे. नवीन वेळापत्रकानुसार मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक आता एप्रिलमध्ये होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

एप्रिलमधील निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. विद्यापीठाची सिनेट निवडणूक एप्रिलऐवजी तातडीने डिसेंबर अखेरपर्यंत घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. दुसऱ्या बाजूला विधीज्ञ सागर देवरे यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. देवरे यांनी याचिकेत मागणी केली आहे की, मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला सिनेट निवडणुका घेण्याबाबत निर्देश द्यावे. ३० नोव्हेंबरपूर्वी या निवडणुका घेण्याचे निर्देश देण्याची मागणी देवरे यांनी याचिकेद्वारे केली आहे. दरम्यान, सिनेट निवडणुकीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील आक्रमक झाली आहे. निवडणूक तातडीने घ्या, अशी मागणी करत मनसेने आज विद्यापीठात ठिय्या आंदोलन केलं. तसेच मुबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना विदूषकची प्रतिमा भेट दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *