मुंबई : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित शिवाजी पार्कच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसह आणखी पाच मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे यांच्यापुढे ठेवल्या. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील असा आशावाद ठाकरे यांनी व्यक्त केला.
राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे मी त्यांच्यापुढे काही मागण्या मांडतो आहे. पहिलं म्हणजे सर्वात आधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही जुनी मागणी आहे, ती मागणी त्यांनी पूर्ण करावी. मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्चा द्यावा.
दुसरं म्हणजे जवळपास १२५ वर्ष या हिंदभूमीवर मराठा साम्राज्य होतं त्याच्या इतिहासाचा देशातल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा. तिसरं म्हणजे शिवछत्रपतींची स्मारकं म्हणजे त्यांनी उभारलेले गडकिल्ले. या किल्ल्यांचं जतन करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष समिती नेमून लक्ष द्यावं. चौथ म्हणजे देशात तुम्ही जसे उत्तम रस्ते बनवलेत, पण गेली २० वर्ष रखडलेला आमचा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करून द्यावा. आणि शेवटचं म्हणजे मुंबई रेल्वेच्या विकासाकडे लक्ष द्यावं, रेल्वेच्या फेऱ्या वाढवा, प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी म्हणून मुंबई रेल्वेला भरपूर निधी द्या”, असे राज ठाकरे म्हणाले.