ठाणे : गिरणी कामगारांसाठी कल्याण ग्रामीण भागातील उत्तराशीव व हेदुटणे येथे घरांची निर्मिती करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या संदर्भात जमिनीच्या मोजणीच्या हालचाली देखील झाल्या आहेत. मात्र या सुरु असलेल्या प्रकाराला मनसे आमदार राजू पाटील आणि स्थानिक भूमिपुत्रांनी विरोध केला आहे. गुरचरण जागेत गावकऱ्यांना रुग्णालये,क्रीडा संकुल,गार्डन उभारण्याची मागणी केलीय तसेच एकाच विभागात शासनाकडून नवनवीन प्रकल्प टाकण्याचा सपाटा सुरु केल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे.
कल्याण ग्रामीण भागातील हेदुटणे व उत्तरशीव येथे म्हाडाच्या माध्यमातून घरांची निर्मिती करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. मात्र गुरु चरण्यासाठी गावकऱ्यांनी अतिक्रमण न करता राखून ठेवलेली जमीन आता शासनाच्या नजरेत आली आहे. नुकतेच या संदर्भात तहसीलदारांना आदेश मिळाल्यानंतर तातडीने ताहिलदारांनी पोलीस फौज फाटा घेऊन गावांमध्ये जमिनीच्या मोजणीच्या कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कायदा व सुरव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी दूरध्वनीद्वारे ग्रामस्थ व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला होता. जमीन मोजणीसाठी गेलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबतच्या संवादाच्या व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या होत्या.त्यामुळे तातडीने मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिलाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन भूमिपुत्रांना देऊन संयम बाळगण्याची विनंती केली होती. यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एकाच विभागात सर्व प्रकल्प टाकण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
याआधी देखील कल्याण तालुक्यातील खोणी,शिरढोण व ठाणे तालुक्यातील भंडार्ली,गोठेघर येथे म्हाडाचे प्रकल्प सुरु आहेत. तसेच एमएमआरडीए व खासगी विकासकांकडून प्रकल्प सुरु आहेत. त्यांनाच पाणी,रस्ते, आरोग्य सेवा,गार्डन,खेळाची मैदान आरक्षित नाहीत. अशा वेळी एकाच परिसरात शासनाचे नवनवीन प्रकल्प टाकत असल्याने आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कल्याण ग्रामीण भागात लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. अशा वेळी शासकीय जागा या स्थानिकांसाठी रुग्णालये,खेळाची मैदान,यांसाठी आरक्षित करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. असे असतानाही गृहसंकुल प्रकल्पांसाठी जागा देण्यात पर्थक सोयी – सुविधांचा विचार करणे आवश्यक होते. मात्र कोणत्याही प्रकारचा विचार न करता सर्रास आरक्षण टाकण्याचा सुरु असलेल्या या कारभारावर मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांसह गृहनिर्माण मंत्री, जिल्हाधिकारी व म्हाडाचे लक्ष वेधले आहे. त्यामुले आता सरकारच्या पुढील भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गिरणी कामगारांच्या घरांना आमचा विरोध नाही – आ. राजू पाटील
आमचा गिरणी कामगारांच्या घरांना कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. तर ज्या ठिकाणी गिरणी होत्या त्याच ठिकाणी गिरणी कामगारांना घर मिळावीत अशी इच्छा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे आता सरकार या प्रश्नी काय निर्णय घेतंय हे पाहणे देखील महत्वाचं ठरणार आहे.