मनसेच्या फुटीर नगरसेवकांचा आज फैसला
मुंबई – शिवसेनेसोबत गेलेल्या मनसेच्या सहा नगरसेवकांची मंगळवार १४ नोव्हेंबरला कोकण विभागीय आयुक्तांपुढे सुनावणी होणार आहे. कोकण आयुक्तांच्या निर्णयावरच पुढील राजकीय गणितं ठरणार आहेत त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष वेधलय.
मनसेतील सात पैकी सहा नगरसेवकांनी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. फुटीर नगरसेवकांची कोंडी करण्यासाठी मनसेने कोकण विभागीय आयुक्तांकडे पत्र व्यवहार केला. पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना पालिकेतील कोणत्याही समित्यांच्या बैठकांमध्ये प्रवेश देऊ नये, प्रस्तावावर मतदान करण्यापासून बंदी घालावी, त्यांचे पालिकेतील सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी पत्राद्वारे केलीय. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी पैशाचा व्यवहार झाल्याचा आरोपही मनसेने केला. यापैकी सदस्यत्व रद्द करण्याची मागणी कोकण आयुक्तांनी फेटाळून लावली. मनसेच्या अन्य मागण्याबाबंत लेखी स्वरुपात म्हणणे मांडण्याची सूचना संबंधित नगरसेवकांना पत्राद्वारे केली होती. मागील आठवड्यात पक्षांतर केलेल्या नगरसेवकांनी आपले लेखी म्हणणे कोकण आयुक्तांकडे मांडल्याचे समजते. सध्या हे प्रकरण कोकण आयुक्तांच्या कार्यालयांत कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे. यावर मंगळवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. या सुनावणीला मनसेच्या याचिकाकर्त्यांनाही बोलाविण्यात येणार आहे. मनसे पदाधिकारी व फुटीर सहा नगरसेवकांच्या उपस्थितीत ही सुनावणी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, दोन्हींकडील सदस्य कोकण आयुक्तांकडे काय बाजू मांडतात. ही बाजू ऎकूण घेतल्यानंतर कोकण विभागीय आयुक्त पुढील निर्णय घेतील.