दि. बा. पाटील यांच्या नावासाठी भूमिपुत्रांचा सिडकोवर एल्गार
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद चांगलाच चिघळत चालल्याचे दिसून येत आहे. शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यावर ठाम आहे. तर स्थानिक भूमीपुत्र लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी आक्रमक बनले आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव या विमानतळाला देण्यात येईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. मात्र आता मनसेचे एकमेव आमदार असलेले प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात भूमिका मांडली आहे. विमानतळाला दि. बा. पाटील यांचंच नाव दिलं पाहिजे अशी मागणी राजू पाटील यांनी केलीय. सिडकोच्या घेराव आंदोलनात राजू पाटील हे उपस्थित हेाते. त्यामुळे राजू पाटील यांच्या भूमिकेवर राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे लक्ष वेधलं आहे.
विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी बुधवारी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी हजारोंच्या सिडकोला घेराव घातला. मोठ्या संख्येने आंदोलक आणि भूमिपुत्र सिडको ऑफिस परिसरात जमले होते. आंदोलकांनी शांतपणे आंदोलन केलं. या आंदोलनात नवी मुंबई, पनवेल, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली अशी विविध ठिकाणहून आंदोलक सहभागी झाले. यावेळी सिडको अधिकाऱ्यांना आंदोलकांकडून एक निवेदन देण्यात आलं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल-शीव महामार्गावर रोडपाली ते बेलापूर अशी वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या वाहतूक कोंडीला सर्वसामान्यांना सामोरं जावं लागलं. नवी मुंबईत काही ठिकाणी यामुळं वाहनांच्या रांगा लागल्या होत्या मुंबईहून पुण्याकडे तसेच पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आला होता. वाशी टोल नाका, वाशी गाव, पाम बीच मार्ग शिळ फाटा या मार्गाने वाहतूक वळवण्यात आली होती. मात्र आंदोलनानंतर नवी मुंबई शहरातील बंद करण्यात आलेली वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
तर विमानतळाचं काम बंद पाडू ..
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील याचं नाव देण्यासाठी स्थानिकांचा एल्गार नवी मुंबईत पाहायला मिळाला. यावेळी स्थानिक भूमिपुत्रांकडून सिडको प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. येत्या १५ ऑगस्टपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव मिळालं नाही तर १६ तारखेपासून विमानतळाचं काम बंद पाडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे
नवी मुंबई विमानतळ हे मुंबई विमानतळाचं एक्सटेन्शन आहे. त्यामुळे त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असणार आहे. .बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावापुढे दुसरं कोणाचं नाव येऊ शकत नाही, छत्रपती शिवाजी महाराज ही आपली ओळख आहे. या भूमीत कोण येईल तो शिवछत्रपतीच्या भूमीत येईल.
आमदार राजू पाटील यांची भूमिका
राज ठाकरे यांनी केवळ तांत्रिक बाब उपस्थित केला होता. या विमानतळाचे कोणतेही नाव अद्याप अंतिम झाले नसेल तर दि.बा.पाटील यांचेच नाव देण्याची आमची भूमिका आजही कायम आहे भूमीपुत्रांचा आवाज आपण यापुढेही उठवत राहू .