डोंबिवली : डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा रेल्वे समांतर रस्त्यास मंजूरीसाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन निवेदन सादर केले.

डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा असा रेल्वे समांतर रस्त्याचा प्रश्न सन २००९ पासून प्रलंबित आहे.तत्कालिन आमदार स्व.हरिश्चंद्र पाटील यांनी या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न करुन सतत पाठपुरावा केला होता. त्यावेळी या रस्त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करुन एमएमआरडीएने ९३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती.परंतु त्यानंतर या रस्त्याचा प्रस्ताव थंड बस्त्यात गेला असून अद्यापही गती मिळालेली नाही.सध्या कोरोनामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा बंद असल्यामुळे रस्ते वाहतुकीचे महत्त्व सर्वांना कळत आहे. दिवा, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली परिसरातील नागरिकांना कल्याण-शिळ रस्त्यावर अवलंबून रहावे लागत असून या रस्त्यावर प्रचंड वाहतुक कोंडी होत असते.या परिसरातील वाढत्या नागरिकरणामुळे भविष्यात कल्याण शिळ रस्त्यावरुन पायी चालायला जागा उरणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल.त्यामुळे डोंबिवली-मुंब्रा रेल्वे समांतर रस्ता अत्यंत आवश्यक आहे.कारण या परिसरातही मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत आहे. तसेच आजही डोंबिवली,कोपर,दिवा, मुंब्रा परिसरातील नागरिकांना रेल्वे वाहतुकीशिवाय कोणताही पर्याय नाही.अतिवृष्टी किंवा तांत्रिक कारणामुळे रेल्वेसेवा बंद पडल्यास येथील रहिवाशांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते.याआधी अनेक वेळा असे प्रकार घडलेले असून चार-चार दिवस लोकांचा जनसंपर्क पूर्णपणे तुटलेला आहे.त्यामुळे हा रस्ता होणे महत्त्वाचे आहे आणि डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा येथील प्रवाशांची मागणी आहे.

याबाबत मनसे आमदार यांनी सांगितले की सर्व तांत्रिक अडचणीवर मात करुन पर्यावरणाचा समतोल राखून, खाजगी जमीन मालकांना योग्य मोबदला देऊन हा रस्ता पूर्ण करणे शक्य आहे. डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कल्याण-शिळ रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी करण्याबरोबरच रेल्वे प्रवाशांना सोयीस्कर पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. हा रस्ता झाला तर डोंबिवली ते मुंब्रा हे अंतर ५ ते ७ मिनिटांवर येईल. परंतु मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नुकतेच खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी. चे अंतर फक्त ६ कि.मी. ने कमी होऊन १३.३ कि.मी. इतके होईल. त्यासाठी ₹ ६६०० कोटी खर्च करणाऱ्या MSRDC ला दुर्दैवाने सदर रस्ता लवकर व्हावा हे आवश्यक वाटले नाही. आणि म्हणूनच आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘भिवंडी-नाशिक राष्ट्रीय महामार्ग व ठाणे-पनवेल राष्ट्रीय महामार्ग (मुंब्रा येथे जोडून ) या दोन्ही रस्त्यांना मानकोली-डोंबिवली-दिवा-मुंब्रा असे जोडून सदरचे प्रकल्प केंद्रीय स्तरावर राबविण्यात यावा अशी विनंती आमदारांनी केली. यामुळे भविष्यात ह्या रस्त्याला मंजुरी मिळाली तर नक्कीच ठाणे पलीकडील प्रवाश्यांना फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!