भंडार्ली गावातील प्रस्तावित कचराभूमी प्रकल्प रद्द करा – मनसे आमदार राजू पाटील.
कल्याण : १४ गावांमधील मौजे भंडार्ली गावातील प्रस्तावित कचराभूमी प्रकल्प रद्द करा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील केली असून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे.
मनसे आमदार पाटील यांनी सांगितले की ठाणे शहरातील कचरा १४ गावांमधील मौजे भंडार्ली येथे टाकण्यासाठी चार हेक्टर जागा ठाणे महानगरपालिकेने भाडे तत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाला भंडार्ली ग्रामस्थांसह १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीने विरोध केला आहे. आधीच १४ गावांमध्ये प्रदुषणाची समस्या असतांना ठाणे महानगरपालिकेचा कचरा जबरदस्तीने या गावांच्या माथी मारत असल्याने सर्व गावांतील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वास्तविक १४ गावे ठाणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट नसून ग्रामपंचायती आहेत. तसेच आपली गावे नवी-मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करावीत यासाठी गेली अनेक वर्षे संघर्ष सुरु असून तसा ग्रामपंचायतीनी ठराव केला आहे व शासनास सादर केला आहे. याच भूमिकेतून सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये सर्व पक्षीय बहिष्कार घातला आहे.आधीच या सर्व गावांना अनधिकृत केमिकल गोदामांनी घेरले असून रासायनिक पदार्थांच्या साठ्यांमुळे नदी, नाले, जमिनीप्रदुषित झाल्या आहेत. गावात पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नाही, आरोग्य सुविधासुद्धा नाहीत. त्यात आता कचराभूमीची भर पडल्यास प्रदुषण अधिक वाढणार आहे.
अनधिकृत गोदामांवर कारवाई करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करुन कचराभूमी प्रकल्प मात्र कुणालाही विश्वासात न घेता लादण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी शुन्य कचरा मोहिम प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे. ठिकठिकाणी प्लांट उभारुन कचऱ्याची विल्हेवाट त्याच ठिकाणी लावल्यास अशाप्रकारे कचराभूमी उभारण्याची गरज भासणार नाही व दिव्यासह सर्वच भाग डंपिंग मुक्त, कचरा मुक्त होईल, जनभावना लक्षात घेऊन आधीच प्रदुषणग्रस्त असलेल्या १४ गावांमधील भंडार्ली येथील प्रस्तावित कचराभूमी प्रकल्प तातडीने रद्द करावा असे मनसे आमदार पाटील यांनी सांगितले.