सीमेवर लढण्यास परवानगी द्या, मनसे नेत्याची आठवलेंकडे मागणी
मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी पाठवले पत्र
कल्याण (सचिन सागरे) : एलफिस्टन दुर्घटने नंतर फेरीवाल्यांच्या प्रश्नासंदर्भात मनसे आक्रमक झाली असून विविध ठिकाणी मनसेने फेरीवाल्यांना पिटाळून लावले आहे. मनसेच्या या कृतीनंतर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मनसैनिकांनी फेरीवाल्यासोबत लढा देण्यापेक्षा सीमेवर जाऊन लढा असे आवाहन दिले होते. मात्र आठवले यांचे हे आवाहन मनसेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव इरफान शेख यांनी स्वीकारले असून, त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून रामदास आठवले यांच्याकडे सीमेवर लढण्याची परवानगी मागितली आहे. शेख यांनी आठवलेंना ईमेलद्वारे पत्र पाठवले आहे.
परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यांबाबत मनसेने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. एलफिस्टन ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक नागरिकांना नाहक आपला जीव गमवावा लागला होता. रेल्वे स्थानक आणि त्या आसपासच्या परिसरात मोठ्या संख्येने फेरीवाले असल्याने नागरिकांना याठीकाणी चालणे देखील मुश्कील होते. यामुळेच एलफिस्टनसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मनसेने फेरीवाल्यांविरोधात आंदोलने करत त्यांना हुसकाऊन लावले होते. यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसैनिकांना फेरीवाल्यांसोबत लढा न देता पाकिस्तान वर हल्ला करण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन स्वीकारण्याची तयारी मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी दर्शविली असून तत्पूर्वी केंद्रीय मंत्री म्हणून आठवले यांनी सीमेवर जाण्याची परवानगी व हल्ला करण्यासाठी लागणारे शस्त्र उपलब्ध करून द्यावे. आणी आपण स्वतः सीमेवर भारतीय जवानांन सोबत सोडण्यास यावे अशी मागणी ईमेल द्वारे केली आहे. तसेच मी सीमेवर कोणतेही मद्य घेणार नाही कारण मध्यंतरी रम प्यायची असेल तर सेनेत भरती व्हा असेही आवाहन देखील आठवले यांनी केले होते. मी ज्या धर्माचे पालन करतो त्या धर्माने ज्या देशात राहता त्या देशाच्या रक्षणासाठी लढा अशी शिकवण दिली असल्याची प्रतिक्रिया इरफान शेख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.