मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून महाविकास आघाडी सरकारविरोधात रणशिंग फुंकले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला. मला ईडीची नोटीस आली मी चौकशीला गेलो. तुम्हाला चार महिन्यापूर्वी आली मग का गेला नाहीत, संपत्तीवर टाच यायला लागल्यावर उध्दव ठाकरे संतापले का अशा शब्दात राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरेंवर हल्ला चढविला. त्यामुळे पुढच्या काळात ठाकरे विरूध्द ठाकरे ,, असा संघर्ष पून्हा एकदा पेटणार असल्याचे दिसून येतय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे पार पडला. यावेळी राज ठाकरे बोलत आहेत. “माझ्या कुटुंबावर येणार असेल तर मला अटक करा असं मुख्यमंत्री म्हणालेत, मग पहिल्यांदा त्यांना सांगा की मुंबई महानगर पालिकेत ये जा करू नका… मला ईडीची नोटीस आली मी गेलो ना चौकशीला, अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं ना, मग भोगा. हे सगळं २०१९ चं आहे, या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका,” असं आवाहन राज ठाकरेंनी जनतेला केलं.
राज ठाकरे यांनी आपला भाषणात शरद पवारांवर सडकून टीका केली. अजित पवार यांचीही त्यांनी नक्कल केली. तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना लक्ष्य केले, जे दोन वर्षे जेलमध्ये होते त्या छगन भुजबळांना मंत्री केलं, ते स्वातंत्र्यसैनिक होते का? असा सवाल त्यांनी केला. गृहमंत्री 100 कोटी मागितले म्हणून जेलमध्ये जातो, आणखी एक मंत्री नवाब मलिक दाऊदशी संबंध आहे म्हणून जेलमध्ये जातो. जेलमध्ये जाताना तुमच्या नाकावर टिच्चून तुम्हाला गाडीतून हात दाखवतो. इतकी हिम्मत येते कुठून? कारण हेच की जनतेला गृहित धरणं…राजकीय पक्ष तुम्हाला मेंढरासारखे वापरतायत”, असं राज म्हणाले. १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करा, ज्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केलं त्यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्याचे असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
मशिदीवरील भोंगे उतरवा …
मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. मात्र मशिदीवरील भेांगे खाली उतरावेच लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची असही राज ठाकरे म्हणाले. कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही, जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशात दिसतात का ? सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा असेही राज ठाकरे म्हणाले. “माझी पंतप्रधानांना विनंती आहे की झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवर धाडी टाका. पोलिसांना देखील माहिती आहे. तुम्हाला पाकिस्तानची गरज नाही, या झोपडपट्टीत इतक्या गोष्टी हाती लागतील कि धडकी भरेल असेही राज ठाकरे म्हणाले.
शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण केलं
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जातीपातीचे राजकारण करत असल्याचे सांगत शरद पवार यांच्यावर टीका केली. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला. त्यापूर्वी महाराष्ट्रात जात हा विषय केवळ अभिमानापुरता मर्यादित होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात दुसऱ्या जातींबद्दल द्वेष निर्माण झाला. मराठा आरक्षण आणि अन्य मुद्द्यांवरून आमिषं दाखवून समाजात फूट पाडण्यात आली. बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या इतिहासकारांना केवळ ब्राह्मण असल्याच्या मुद्द्यावरून लक्ष्य करण्यात आले. पुरोगामी महाराष्ट्राला जातीपातीच्या राजकारणात खितपत पडलेले बघायचे आहे का, “जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलेलो आपण हिंदू म्हणून कधी एकत्र येणार,” असा सवाल राज ठाकरेंनी केला.
आमदारांना कसली घरं वाटताय?
आमदारांना मुंबईत घरं द्या आणि त्यांची फार्महाऊस आपल्या नावावर करून घ्या, असं राज ठाकरे म्हणाले. आमचा आमदार राजू पाटील याने सर्वात आधी त्यांना विरोध केला. आमदारांना मिळणाऱ्या पेंशनलाही त्यांनी विरोध केला. ते लोकांसाठी काम करत आहेत, उपकार करत नाही, तसेच मुख्यमंत्र्यांकडे घर कोणत्या आमदाराने मागितलं होतं” असं राज ठाकरे म्हणाले.
स्वाभिमान गहाण टाकू नका ….
शेतकरी आत्महत्या करतोय त्यामागे परकीय हात आहे का? मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, यात परकीय हात आहे का? ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला सारून काम न करणाऱ्यांना तुम्ही सत्तेवर बसवलं, मग काम करून काय फायदा, लफंगेगिरी करणाऱ्यांना तुम्ही सत्तेत बसवत आहात,” असा सवाल राज ठाकरेंनी जनतेला केला. जेव्हा माणूस स्वाभिमान गहाण टाकतो, तेव्हा उरतात ती फक्त प्रेतं, असं म्हणत राज ठाकरेंनी जनतेला स्वाभिमान जागा ठेवत यांना यांची जागा दाखवा,” असं राज ठाकरे म्हणाले.