मनसेकडून काँग्रेस कार्यालयाची तोडफोड : संजय निरूपम विरूध्द मनसे संघर्ष पेटणार
इट का जवाब पथ्थर से मिलेगा : मनसेचा इशारा
मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम आणि मनसे यांच्यातील वाद चांगलाच पेटण्याची शक्यता निर्माण झालीय. शुक्रवारी मनसैनिकांनी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक ..इट का जवाब पथ्थर से मिलेगा.. केला असल्याचं ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी तीन मनसैनिकांना ताब्यात घेतलय.
विक्रोळीतील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदान परिसरातील काँग्रेसच्या कार्यालयाची मनसेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी तोडफोड केली. रविवारी विक्रोळीत मनसेकडून मराठी पाट्या लावण्यासाठी दुकान मालकांना निवेदन दिले जात होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्ता अब्दुल अन्सारी आणि त्याच्या १५ ते २० साथीदारांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. या घटनेत मनसेचे विभागप्रमुख विश्वजित ढोलम आणि अन्य चार जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मनसेवर टीका केली होती. मनसेच्या गुंडांनी परत मारा खाल्ला, असं ट्विट केले होते. त्यामुळे मनसैनिक संतापले होते. रविवारी सकाळी मनसैनिकांनी निरूपम यांच्या काँग्रेस कार्यालयाच्या काचा आणि सामानाची तोडफोड केली. सुरूवातीला हा हल्ला कोणी केला याबाबत संभ्रम होता मात्र मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. दरम्यान या हल्ल्याचा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निषेध केलाय. विचारांची लढाई विचारांनीच लढायला हवी, तोडफोड किंवा मारहाण करुन नाही, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिलीय.