कल्याण / प्रतिनिधी :  वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. चेस द व्हायरस संकल्पनेनुसार कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान 1 ते 20 व्यक्तीना  इन्स्टिट्यूशनल कॉरंटाईन बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विशेष पथकही तयार करण्यात आले असून वरिष्ठ दर्जाच्या अधिकार्याची या टीम प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.
या निर्णयामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून विनाकारण महापालिका आम्हाला कायद्याची भिती दाखवून बडगा उगारत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर याप्रकरणी मनसेचे गटनेता मंदार हळबे यांनी पालिका आयुक्तांच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे.

यापूर्वी कोरोना रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या घरच्यांनाच इन्स्टिट्यूशनल कॉरंटाईन केले जात होते. तर संबंधित इमारतीमधील त्या मजल्यासह सर्व रहिवाशांना होम कॉरंटाईन केले जायचे. मात्र होम कॉरंटाईनसाठी असणारे नियम लोकांकडून सर्रासपणे धाब्यावर बसवल्याचे अनेक प्रकारातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे अखेर महापालिका आयुक्तांनी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान 1 आणि जास्तीत जास्त 20 व्यक्तींना तसेच कोरोना रुग्ण ज्या मजल्यावर राहतो त्या मजल्यावरील सर्व व्यक्तींना इन्स्टिट्यूशनल कॉरंटाईन बंधनकारक केले आहे.  मनसेने पालिका आयुक्तांच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. पालिका प्रशासनाने लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा निर्णय घेतला असून तो अतिशय अन्यायकारक असल्याचे मनसे गटनेता मंदार हळबे यांचे म्हणणे आहे.

महापालिकेने सुरवातीला हा निर्णय घ्यायला हवा होता आणि सुरुवातीलाच ते केलं असत तर कोरोनाचा प्रसार इतका वाढतंच नसता. आमचे पालिका प्रशासनाला पूर्ण सहकार्य आहे आणि त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता आयुक्त आणि महापौर यांनी हा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसे न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही हळबे यांनी दिला आहे. .( मंदार हळबे मनसे गटनेता केडीएमसी)

सोसायटीकडून आलेल्या तक्रारींनंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे. तो नागरिकांच्या भल्याचा असून लोकांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी केले आहे. . .(विजय सूर्यवंशी, आयुक्त केडीएमसी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!