अंबरनाथ : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता व संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता लहान मुलांचा संसर्ग विचारात घेऊन कोविड केअर सेंटर अद्ययावत करणे आवश्यक आहे. अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रातील यु.पी.एस.सी. सेंटरमध्ये अतिदक्षता विभागाकरिता मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणमार्फत रु. ८.०४ कोटी निधीस मान्यता देण्यात आली आहे

अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रातील यु.पी.एस.सी. सेंटर येथे ५० आय.सी.यु. बेड व १५० ऑक्सिजन बेडची सुविधा व १०० साधारण बेड अशी एकूण ३०० बेडची व्यवस्था निर्माण करण्यासाठी व सदर कोविड केअर सेंटरसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे व फर्निचर, व त्या त्या उपकरणांचे पुरवठादार करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा याकरिता अंबरनाथ नगरपरिषदेने सदर प्रस्ताव प्राधिकरणास सादर केला होता, त्यास मंजुरी मिळण्याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व अंबरनाथ नगरपरिषद यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे तब्बल रु. ८.०४ कोटी निधीच्या प्रस्तावास प्राधिकरणामार्फत हिरवा कंदील मिळाला आहे.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ज्ञांकडून वारंवार देण्यात येत आहे. या लाटेत लहान मुले अधिक प्रमाणात बाधित होणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास लहान मुलांसाठी हाय फ्लो यंत्रणा उभारण्यासाठी व ज्या मुलांना गहन वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते, त्यांना समर्पित नवजात आईसीयू घटकांमध्ये ठेवले जाते. यापैकी प्रत्येक एनआयसीयू युनिट आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या अनुषंगाने अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रात सुसज्ज असे अतिदक्षता विभाग असणे अत्यंत गरजेचे असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. जेणेकरून कोरोना बाधितांना त्वरित उपचार घेता येऊ शकतो. अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या यु.पी.एस.सी. सेंटर येथे अशा प्रकारचे सुसज्ज असे अतिदक्षता विभाग निर्माण करण्याची आवश्यकता आहे, ज्यामध्ये ५० आय.सी.यु. बेड व १५० ऑक्सिजन बेडची सुविधा व १०० साधारण बेड अशी एकूण ३०० बेडचा विभाग वैद्यकीय उपकरणे, प्राणवायू वाहिन्या यांचा समावेश असेल. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील शास्त्रीनगर रुग्णालय येथे बालरोग विभाग तयार करण्याकरिता स्थानिक खासदार विकास निधीतून १.२५ कोटी निधी तर नगरविकास विभागाकडून इतर स्थापत्य कामे करण्याकरिता १.३३ कोटी मंजूर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *