ठाणे : कल्याण तळोजा मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली आहे. नुकतीच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मतदारसंघातील वाहतूकीला वेगवान करण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी एमएमआरडीए आयक्तांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीत या प्रकल्पांना गती देण्यासाठीच्या सूचना त्यांनी केल्या. यात चौथी मुंबई म्हणून म्हणवल्या जाणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर शहरांना जोडले जाणारे महत्वाचे रस्ते तसेच उल्हासनगर, डोंबिवली शहरातील कोट्यावधी रूपयांच्या रस्ते कामाला गती मिळणार आहे.

कल्याण, डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या भागात रस्ते आणि वेगवान वाहतुकीची साधने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील एमएमआरडीएच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्या दालनात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अंबरनाथचे आमदार डॉ.बालाजी किणीकर, उल्हासनगरचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, अंबरनाथ नगरपरिषदचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ उपस्थित होते.

यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मतदारसंघातील सुरू असलेल्या कामांना गती देण्याच्या सूचना केल्या. अंबरनाथ, उल्हासनगरसह कल्याण आणि डोंबिवलीतील प्रवाशांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या कल्याण मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा आढावा यावेळी घेण्यात आला. या मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे यावेळी एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवास यांनी स्पष्ट केले.
डोंबिवली शहरातील निवासी विभाग आणि औद्योगिक विभागातील रस्त्यांच्या कामासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने प्रयत्न केल्याने ११० कोटींचा निधी यापूर्वीच मंजूर करण्यात आला होता. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करुन प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात केली जाणार आहे. उल्हासनगर शहरातील विविध रस्त्यांच्या कामांकरिता १७६ कोटी रूपये मंजूर करण्यात आले होते. या कामांना आता तांत्रिक मंजूरी मिळवण्यात यश आले आहे. यासाठीचा अहवाल एमएमआरडीएकडे सादर केला असून एमएमआरडीएकडून पुढील कार्यवाही तातडीने करण्याच्या सुचना आयुक्त श्रीनिवास यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या रस्त्यांच्या उभारणीनंतर अंतर्गत वाहतुकीला मोठा फायदा होणार आहे.

Ø जोड रस्त्याचे लवकर सर्वेक्षण

खोणी – तळोजा रस्ता (करवले गाव) ते महामार्ग क्र. ४ रस्त्याला जोडणारा महत्त्वपूर्ण विकास रस्त्याची (डीपी रस्ता) उभारणी ही काळाची गरज आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने सर्वेक्षण करून या रस्त्याच्या उभारणीच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. या रस्त्यामुळे कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होण्यास मदत होणार असून अंबरनाथ, बदलापूर आणि मलंगगड परिसरातील नागरिकांना याचा थेट फायदा होईल.

Ø संयुक्त घनकचरा प्रकल्पासाठी समिती

अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर या अ वर्ग नगरपरिषदांच्या संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा SPV अंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन त्यावर समिती नेमण्यात येणार असल्याचे एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवास यांनी बैठकीत सांगितले आहे. त्यामुळे या कामालाही लवकरच गती मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!