मुंबई : भारत आणि जपानचे भावनिक संबध आहेत. हजार- बाराशे वर्षापूर्वीच भंते बोधी सेना हे जपानमध्ये जाणारे पहिले भारतीय होते.  नारा शहरातील बौध्द मंदिर उघडण्यासाठी ते गेले हेाते. त्यामुळे बुध्द धम्माने भारत जपान संबध अधिक दृढ झाले आहेत असे प्रतिपादन जपानमधील इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्यकारीणी सदस्य आणि मियाको अक्वा रेसर्च लॅबोरेटरी फाऊंडर अँड डायरेक्टर डॉ. चैतन्य भंडारे यांनी केले. 

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने ‘जपानमध्ये मराठी युवक-युवतींना असलेल्या करियर संधी : शोध आणि वेध’ या विषयावर डॉ चैतन्य भंडारे यांचा वार्तालाप कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. तर अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी डॉ चैतन्य भंडारे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले. 

डॉ चैतन्य भंडारे यांनी सांगितले की, जपानमध्ये वयस्क लोकसंख्या वाढत असून, कार्यरत ( वर्किंग) लोकसंख्या कमी हेात आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. याउलट भारतात तरूण वर्ग मोठया प्रमाणात असून, त्यांना रेाजगाराची संधी आवश्यक आहे. त्यामुळे जपानमध्ये करिअर करायचे असेल, तर जपानी भाषा शिकणे खूपच गरजेची आहे. सध्या भारत- चायना प्रॉब्लेम सुरू आहेत. चायनामध्ये ज्या जापनीज कंपन्या आहेत. त्या कंपन्या तेथून हळूहळू बाहेर पडू इच्छित आहेत. प्रमुख कंपनींची मॅन्युफॅक्चरींग हब चायनामध्ये आहे. चायना बंद झालं, तर जग बंद होईल हे कोरोना काळात दिसून आले आहे. भारतातही अनेक जापनीज कंपन्या येत आहेत. त्यामुळे ज्यांना जपानमध्ये करीअर करायचे आहे त्यांनी जपानी भाषा शिकावी असे आवाहनही डॉ भंडारे यांनी केले.

राधा विनोद पाल यांचे स्मारक

भारत जपान संबधाविषयी आणखी एक आठवण सांगताना डॉ भंडारे म्हणाले की, दुस-या महायुध्दानंतर जपानने केलेल्या युध्द गुन्हयांवरील शिक्षेसाठी जगभरातून १२ न्यायाधीश आले होते. त्यात राधा विनोद पाल हे एकमेव भारतीय होते. चार ते पाच महिने हा खटला चालला. त्यातील अकरा जणांनी शिक्षा करा असे सांगितले. मात्र राधा विनोद पाल यांनी १२८७ पानांचे निकालपत्र दिले होते, त्यात जापनीज युध्द गुन्हेगार नाहीत हे त्यांनी पटवून दिले होते. जपानमध्ये राधा विनोद पाल यांचे स्मारक असून, टोकिओ आणि क्योतो शहरामध्ये त्यांचा जन्मदिवस धुमधडाक्यात साजरा होतो. मात्र भारतातील अनेकांना त्यांच्या विषयी माहिती नाही याकडेही डॉ भंडारे यांनी लक्ष वेधले. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस हे जपानमध्ये गेले होते त्यावेळी एका झाडाखाली बसून, भारताला मदत करायची अशी चर्चा झाली होती. त्यामुळे भारत जपानचे संबध खूप जुने आहेत असे डॉ भंडारे यांनी सांगितलं.

सांमजस्य करारासाठी प्रयत्न करणार

बारावीत नापास झाल्यानंतरही जपानमध्ये कसं करिअर घडवलं याचीही माहिती डॉ चैतन्य यांनी दिली. समुद्र पाहायला मिळेल या एकमेव कारणामुळेच बीएस.सी.ला फिशरी विषय घेतल्याचे चैतन्य यांनी सांगितले. महाराष्ट्रात अनेक विद्यार्थांना बी.एसी. बीए, बी.कॉम. च्या पुढे काय करायचे हे माहीत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे असेही ते म्हणाले. चैतन्य यांनी डॉक्टरेट मिळवल्यानंतर जपानमध्ये दोन कंपन्या स्थापन केल्या असून तरूणांना ट्रेनिंग आणि जॉब देत आहेत. तरूणांना फिशरीसह इतर जॉब, व्यवसायासाठी महाराष्ट्राशी सांमजस्य करार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वार्तालाप कार्यक्रमात पत्रकार संघाच्या विश्वस्त राही भिडे उपस्थित होत्या. पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!