अर्थसंकल्प ही ठिपक्यांची सुंदर रांगोळी ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय -प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे ‘राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात…’ या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्य शाळेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. काल विद्यार्थ्यांची शाळा भरली आणि आज आमदारांची कार्यशाळा पार पडली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी असून प्रत्येक ठिपका हा राज्याचा मतदारसंघ आहे, हे मतदारसंघ जोडले तर जी सुंदर रांगोळी तयार होणार आहे त्यात आपल्याला विकासाचे रंग भरावयाचे आहेत. त्यातूनच विकसित राज्याची सुंदर रांगोळी आपल्याला रेखाटता येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. अर्थसंकल्पातील योजना आणि विकासकामांचा अधिकाधिक लाभ आपापल्या मतदारसंघातील नागरिकांना मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सजग राहून पाठपुरावा केला पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले.
या कार्यशाळेला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई, संसदीय कार्य राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहाचे सदस्य, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे मानद सल्लागार हेमंत टकले, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संपूर्ण राज्य हाच आपला मतदारसंघ
अतिशय महत्वाच्या विषयावर वि.स. पागे प्रशिक्षण केंद्राने कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करत म्हटले की, कालच राज्यातील शाळा सुरु झाल्या आणि आज आपला इथे वर्ग भरला… आजही आपण विद्यार्थीच आहोत. मी विधानपरिषदेचा आमदार असल्याने संपूर्ण राज्य हाच माझा मतदारसंघ म्हणून मला संपूर्ण राज्याचा विचार करावा लागतो.
अधिवेशनावर सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष
ठाकरे म्हणाले की, आपण ज्या लोकप्रतिनिधींना मतदान करतो ते मतदार विधानमंडळाच्या कामकाजावर लक्ष ठेवून असतात. मतदारसंघाचे किती प्रश्न सभागृहात मांडतात याकडे मतदारांचे लक्ष असते. त्यामुळे थोर परंपरा लाभलेल्या या सभागृहात बोलण्याची संधी मिळाली असताना सभागृहाचे कामकाज समजून घेवून आपल्याला मिळालेली ही उच्च परंपरा कशी जपता येईल याची प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.
मतदारसंघातील विषय मांडण्याची कला आत्मसात करावी- रामराजे नाईक-निबांळकर
अर्थसंकल्प हा साद्या सरळ सोप्या भाषेत मांडता आला पाहिजे. यासाठी अनुभवी विधिमंडळ सदस्यांची समिती गठीत करून अर्थसंकल्प कसा साध्या-सोप्या भाषेत मांडता येईल याचा प्रस्ताव विधिमंडळाच्या विचाराधीन आहे. अधिवेशन काळात विधानसभेत, विधानपरिषदेत कसे बोलले पाहिजे, प्रश्न-उत्तरे, लक्षवेधी कशी मांडली पाहिजे याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या मतदारसंघातील विषय त्या विषयाचे महत्व आणि विधानमंडळाचे कामकाज याची योग्य सांगड घालूनच कधी विषय मांडायचा, ही कला आत्मसात केली पाहिजे, असे विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.