मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. मूळ शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निकालाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची भूमिका खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केली. त्यामुळे पुन्हा एकदा खरी शिवसेना कोणाची याच वाद कोर्टात जाणार आहे.

शिवसेनेत अभूतपूर्व बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्तेत सामील झाले. त्यानंतर ठाकरे गटाने शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या विरोधात पक्षांतरबंदी कायद्यान्वये याचिका दाखल केली. त्याचवेळी शिंदे गटाच्या वतीनेही ठाकरे गटातील १४ आमदारांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या दोन्ही गटाच्या अपात्रतेच्या याचिका राहुल नार्वेकरांनी फेटाळल्या आहेत. त्यामुळे कोणताही आमदार अपात्र ठरलेला नाही.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबर २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी पूर्ण झाली. त्या निकालाचे वाचन विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी केले. पक्ष ठरवताना पक्षाची घटना, विधिमंडळातील बहुमत, नेतृत्त्व हे घटक महत्त्वाचे असून, निवडणूक आयोगाचा निकालही विचारात घेतला गेला आहे. यासाठी शिवसेनेची २०१८ सालची घटना ग्राह्य धरली गेली नसल्याचेही त्यांनी निकाल वाचनात म्हटले आहे. 

 भरत गोगावलेच अधिकृत व्हीप
 विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना हा खरा शिवसेना पक्ष असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलं. तसेच या शिवसेनेनं नेमलेला व्हिप भरत गोगावले हेच अधिकृत व्हिप म्हणूनही त्यांनी मान्यता दिली.

 म्हणून शिंदे चे आमदार पात्र
२१ जून २०२२  च्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहजरीच्या मुद्दयावर अपात्रता ठरविता येणार नाही. केवळ संपर्काच्या बाहेर गेले या कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही. शिवाय, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक यांनी सूरतेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हे ही सिद्ध झाले. यामुळेच शिंदे गटाचे आमदार पात्र ठरले आहेत.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!