मुंबई : आमदार संजय शिरसाट यांच्या आक्षेपार्ह वक्तव्य विरोधात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर आता अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. त्यामुळे अंधारे आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण आमदार संजय शिरसाट यांना भोवण्याची शक्यता आहे.
आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर मधील मेळाव्यात ठाकरे गटाचे उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होत. शिरसाट यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संभाजीनगर, परळी आणि पुणे या ठिकाणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र पोलिसांकडून त्याची नोंद करण्यात आली नसल्याने महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे अंधारे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे महिला आयोगाने तातडीने कारवाई करण्याची मागणी अंधारे यांनी आयोगाकडे केली आहे. दरम्यान महिला आयोगाकडून या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली असून, पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शिंदे गटाच्या आमदारांकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली जात आहे. त्यामुळे त्याला कुठेतरी चाप बसावा. तसेच शितल म्हात्रे प्रकरणात जशी तातडीने कारवाई केली तशीच कारवाई शिरसाट यांच्यावर व्हावी अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.