या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?
आ. आव्हाड यांची दारुच्या होम डिलीव्हरीवर सरकारवर आगपाखड
ठाणे (प्रतिनिधी)- एकीकडे गोरगरीबांना रेशनवर धान्य मिळत नाही; 12 ते 18 तास वीज गायब आहे. पाण्यासाठी लोक पायपीट करीत आहेत. या मूलभूत गरजा भागवण्याऐवजी तसेच राज्यात निर्माण होत असलेली दुष्काळी स्थितीवर नियोजन करण्याऐवजी हे सरकार लोकांना घरपोच दारु देण्याची नीती अबलंबित आहेत. दारु पाजून लोकांना सरकारचा नाकर्तेपणा विसरायला लावणार्या या सरकारचे डेके खरंच ठिकाणावर आहे का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
मद्यपींसाठी महाराष्ट्र सरकार एक नवीन धोरण लागू करण्याची शक्यता आहे. घरपोच दारु पोहोचवण्याच्या योजनेवर राज्य सरकार विचार करत आहे. दारु उद्योगासाठी ही योजना ‘गेम चेंजर’ ठरेल, असा विश्वास उत्पादनशूल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखवला आहे. सरकारच्या धोरणावर आ. आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे.
‘ आज राज्यातील शिधावाटप दुकानांमध्ये गोरगरीबांना धान्य मिळत नाही. त्यांची उपासमार सुरु आहे. गोरगरीब लोक दोनवेळच्या अन्नासाठी मोहताज झाले आहेत. राज्याच्या ग्रामीण भागात पाण्याची टंचाई भेडसावू लागली आहे. काही ठिकाणी तर आठ -आठ दिवस पाणीपुरवठा बंद करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे नियोजन करणे या सरकारला शक्य झालेले नाही. मराठवाड्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या शेतकर्यांची कर्जमाफीतही घोळ घातला आहे. वीज भारनियमनाने तर कहरच केला आहे. आघाडीच्या काळात विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेले महाराष्ट्र आता वीजटंचाईने ग्रासले आहे. अनेक ठिकाणी 12 ते 18 तास भारनियमन केले जात आहे. या सर्व समस्यांची सोडवणूक करण्याऐवजी हे सरकार लोकांना घरपोच दारु पाजण्याचा खेळ खेळत आहे. असे म्हणतात की दारु पिऊन दु:ख विसरण्याचा प्रयत्न केला जातो. इथे हे सरकार महाराष्ट्राला दारु पाजून.. झिंगवून… गटारात लोळवून आपला नाकर्तेपणा विसरण्यास प्रवृत्त करीत आहे. एकप्रकारे या सरकारने लोकांना घरी दारु पोहचविण्याचा विडा उचलून लोकांना दारु पाजण्याचे फर्मानच काढले आहे. त्यामुळे हा सुसंस्कारीत महाराष्ट्र अशा सरकारला आता धडा शिकवेलच, असे आ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.