भाजप समर्थक आमदार गणपत गायकवाड यांना ५० लाखाच्या खंडणीसाठी सुरेश पुजारीची धमकी

कल्याण ; कळवा येथील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आता कल्याण पूर्वेचे भाजप समर्थक अपक्ष आमदार तथा केबल व्यावसायिक गणपत गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी गँगस्टर सुरेश पुजारी याने फोनवरून धमकी दिल्याचे समोर आले आहे. ‘५० लाख दे, नाही तर वाईट परिणाम होतील’, असा धमकीचा फोन आल्यानंतर आमदार गायकवाड यांनी पोलिसात तक्रार केली आहे. गेल्या काही दिवसातील घटनांवरून पुजारी टोळीने आपल्या कारवाया वाढवण्याचे प्रयत्न चालविल्याचे समोर येत आहे.

गँगस्टर सुरेश पुजारीने मलेशियात बसून ठाणे व परिसरातील व्यापारी, बांधकाम व्यावसायिकांना धमकावून खंडणी वसूल करण्याचे सत्र सुरु केल्याचे बोलले जात असतानाच कल्याण पूर्वचे आमदार गायकवाड यांनाही त्याने खंडणीसाठी धमकावल्याचे समोर आले आहे. या धमकीसत्रामुळे राजकीय, तसेच केबल व्यावसायिक मंडळींचे धाबे दणाणले आहे. सत्ताधारी भाजपचे समर्थक आमदार गायकवाड यांना दिलेल्या धमकीची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून, या प्रकरणावर ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने करडी नजर ठेवली आहे. यापूर्वी सुरेश पुजारी टोळीने अशीच धमकी राष्ट्रवादीचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिली होती. तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहून आपल्याबाबत कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याला आपण जबाबदार असल्याचे म्हटले होते.  दरम्यान, आठवड्याभरापूर्वी कल्याण पश्चिमेतील हॉटेल व्यावसायिक भास्कर शेट्टी यांनाही याच गँगस्टर पुजारीकडून धमकावण्यात आले होते. शेट्टी यांना फोन करणाऱ्याने आपण सुरेश पुजारी बोलत असल्याची ओळख दिली. ‘बऱ्या बोलाने २५ पेट्या टाक नाही तर ढगात पाठवीन’, अशी धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आली होती.

वादग्रस्त अधिकाऱ्यांकडे संशयाची सुई
ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या या खंडणी सत्राबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. एक वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकात आल्यावर हे खंडणी सत्र सुरू झाल्याचे या पोस्टमध्ये म्हटल्याने खळबळ उडाली आहे. हा अधिकारी या पूर्वी निलंबित होता. पण, आता तो सेवेत रुजू झाला आहे. या अधिकाऱ्याने अंडरवर्ल्डशी संगनमत करून मोठी माया जमवल्याचा आरोप देखील या व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *