विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
मुंबई : शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
वडेट्टीवार यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. या प्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालाने देखील अनेक महत्वपूर्ण निष्कर्ष नोंदवून आपण या प्रकरणी न्यायनिवाडा करावा असे निर्देशित केले आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांवर नेमकी काय कारवाई होणार हे देखील महाराष्ट्राला कळणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील राजकारणाच्या ढासळत्या दर्जामुळे राज्यातील नागरिकांमध्ये एकंदर राजकीय व्यवस्थेबाबत नकारात्मकता निर्माण झाली असून हे लोकशाहीच्या हिताचे नाही.
लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष सुनावणीकडे लागले आहे. संवैधानिक संस्था, संवैधानिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावी यासाकडे वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे लक्ष वेधले आहे.
सोमवारी सुनावणी होणार
दुसरीकडे, सुप्रीम कोर्टाने या सुनावणीच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या कामाला वेग आला आहे. अपात्रतेच्या मुद्यावर अध्यक्षांनी १४ सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली. त्यानंतर ती आता २ आठवडे लांबणीवर टाकण्यात आली होती. पण आता सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर ती २५ तारखेला म्हणजे सोमवारी घेण्यात येणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या सुनावणीला शिवसेनेच्या दोन्ही गटांचे प्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.