मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंद असलेल्या शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख पदाचा उल्लेख नसल्याचा जोरदार दावा शिवसेनेचे (शिंदे) वकील महेश जेठमलानी यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे यांना पक्षाचा गटनेता, प्रतोद निवडीचे अधिकार नसल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटविण्याचा ठराव बनावट असल्याचा युक्तिवाद केला. शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी जेठमलानी यांचे सर्व दावे फेटाळून लावत सडेतोड उत्तर दिली.

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता सुनावणीला सुरूवात केली. दरम्यान, शिवसेना गटनेतेपदावरून एकनाथ शिंदे यांना २१ जून २०२२ रोजी हटविण्याचा आणि आमदार अजय चौधरी यांची निवडीचा ठराव कोणत्या आधारावर केला असा थेट प्रश्न वकील जेठमलानी यांनी प्रभू यांना केला. तसेच प्रतिज्ञापत्राच्या पहिल्याच ओळीत पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे, हे कोणत्या आधारावर नमूद केले. कोणतीही खातरजमा न करता, केवळ बातम्यांच्या आधारावर आमदारांना बैठकीच्या नोटीस काढण्यात आली, असा दावा जेठमलानी यांनी करत प्रभू यांची कोंडी केली.

प्रभू यांवर उत्तर देताना, सुरतला गेलेल्या आमदारांकडून आपल्यामागे राष्ट्रीय शक्ती असल्याचा दावा केला. त्यामुळे सरकार अस्थिर होईल या शक्यतेने नोटीस काढल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रीयशक्ती या शब्दाचे भाषांतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘नॅशनल पाँवर’ असे केले. त्यावर महेश जेठमलांनी यांनी हास्य करीत सुनील प्रभूंना ‘नॅशनल’ की ‘अँटी नॅशनल’ असा सवाल केला. त्यावर एका क्षणाचीही विलंब न लावता ‘मी नॅशनल’ असे उत्तर प्रभूंनी देत बाजू मांडली.

प्रतोद पदावरून हटवण्याचे अधिकार आमदारांना नाहीत – सुनील प्रभू

मुख्य प्रतोद म्हणून ३१ आमदारांनी तुम्हाला पदावरून काढून टाकले. त्यामुळे तुमचा व्हीप लागू होऊ शकत नाही, असे जेठमलानी यांनी दावा केला. प्रभू यांनी तेवढ्याच शिताफीने त्यांच्या दाव्याला प्रतिउत्तर दिले. मुख्य प्रतोद पदावरून हटवण्याचा अधिकार आमदारांना नाही. माझी नियुक्ती पक्ष प्रमुखांनी केली आहे. त्यामुळे पदावरून काढण्याचे ही अधिकार पक्षप्रमुखांचे आहेत, असे सांगितले.

आमदार दिलीप लांडे यांची सही खोटी – जेठमलानी

वर्षा बंगल्यावर २२ जून २०२२ रोजी झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवण्याच्या ठरावाला दिलीप लांडे यांनी अनुमोदन दिले नाही. त्यामुळे झालेला ठराव खोटा आहे. तसेच दिलीप लांडे यांनी ठरावावरील सही आणि त्या दिवशीच्या हजेरी पटावरील सही पूर्णतः वेगळी आहे, असा दावा जेठमलानी यांनी केला. सुनील प्रभू यांनी हे सर्व दावे खोटे असल्याचे उत्तर दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!