मुंबई: शिवसेना ​ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे बुधवारी सकाळी दुःखद निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. न्यूमोनियाचे निदान झाल्यामुळे मंगळवारी दुपारी त्यांना सांगलीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण आज सकाळी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.​ 

आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. 

अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशास​नाला दिल्या आहेत. अनिल बाबर यांच्या निधनामुळं आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: खानापूर आटपाडीला जाऊन अनिल बाबर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेणार आहेत.

दीड वर्षापूर्वी पत्नीचे निधन

अवघ्या दीड वर्षांपूर्वी ऑगस्ट  २०२२ मध्ये आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभाताई यांचे निधन झाले होते.  त्यामुळे बाबर कुटुंबीयावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बाबर यांच्या पत्नी शोभाताई बाबर यांना न्यूमोनिया झाल्यानंतर सुरुवातीला विटा येथे खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. त्यानंतर त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं आहेत.  

 सरपंच ते आमदार असा प्रवास

कुटूंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अनिल बाबर यांनी सरपंच ते आमदार असा मोठा राजकीय प्रवास केला. ते पहिल्यांदा १९७२ मध्ये सांगली जिल्हा  परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेले. त्यांनी विविध समित्यांचे सभापतीपद सुद्धा भुषवले. १९९० त्यांनी अपक्ष म्हणून आमदार निवडणूक लढवली. १९९९ मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाले. स्वर्गीय आर. आर. आबा यांच्याशी सुद्धा त्यांचे घनिष्ठ संबंध होते. सांगली जिल्ह्यात महत्वपूर्ण असलेल्या टेंभू योजनेचे जनक म्हणून ओळख ओळखले जाते. आमदार बाबर सलग  २० वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. मागील दोन निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा त्यांची जवळीक होती. ऐनवेळी फडणवीस यांच्या आग्रहामुळे गोपीचंद पडळकर यांनी २०१९ ला पाठिंबा दिल्याने निवडणुकीत यश मिळाले होते.

अनिल बाबर यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी , शिवसेना असा राजकीय प्रवास राहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळख होती. विटा आणि खानापूर मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने कोट्यवधींची विकासकामे मंजूर केली होती. सेना आमदारांची कामे होत नाही, म्हणून झालेल्या तक्रारींची चौकशी अहवाल तयार करा म्हणून मुख्यमंत्र्यांनी बाबर यांना दिली होती. मंत्रिपदासाठी नव्हे, टेंभू योजनेच्या पूर्णत्वासाठी शिंदेंसोबत जात असल्याचेही आमदार अनिल बाबर यांनी म्हटले होते.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.​ अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.​  मुख्यमंत्री म्हणतात की, आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते.​ 

बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे असेही मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!