कल्याणच्या पोलिसांची चक्रावून टाकणारी कामगिरी
मुलगी सुखरूप सापडल्याने पोलिसांसह आईने सोडला सुटकेचा निःश्वास
डोंबिवली : कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये फूले आणि पाने विक्रेत्या महिलेची चार वर्षाची मुलगी अचानक बेपत्ता झाली. एपीएमसी मार्केट परिसरात नशेखोर गर्दुल्ल्यांचा वावर असल्याने घाबरलेल्या आईने बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल दिली. पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला. मुलीला शोधण्यासाठी डॉग स्कॉडची मदत घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक तपास सुरू असतानाच अथक १८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर बेपात्ता मुलगी एका महिलेजवळ सापडली. मुलगी सुखरूप सापडल्यानंतर पोलिसांसह तिच्या आईनेही सुटकेचा निःश्वास सोडला. या चिमुरडीला पोलीसांनी तिच्या आईच्या स्वाधीन केले आहे.
कल्याण पश्चिमेतील जोशी बागेत राहणारी सुनिता माळी ही २८ वर्षीय महिला फुले आणि पाने विकते. ती कल्याण पश्चिमेकडील एपीएमसी मार्केटमध्ये आली. तिच्यासोबत मुलगी अनन्या देखील होती. मार्केटमधील शेतकरी कट्ट्याजवळून अनन्या अचानाक गायब झाली. कुणीतरी तिला घेऊन गेल्याचा संशय आईला आला. आईने शोध घेऊनही अनन्या सापडली नाही. अखेर आईने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. एकीकडे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला, तर दुसरीकडे पोलिसांनी तपासचक्रांना वेग दिला. वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल पवार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अनन्याला शोधण्यासाठी तीन पथके तयार केली.
वपोनि सुनिल पवार, पोनि लक्ष्मण साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली किरण वाघ, दीपाली वाघ, संतोष भुंडेरे, अजिंक्य मोरे या अधिकाऱ्यांच्या पथकाने अनन्याचा तपास सुरु केला. यासाठी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. जवळपास १८ तास पोलिसांची तीन पथके या मुलीचा शोध घेत होते. अखेर ही मुलगी एका महिलेकडे सुखरुप असल्याची माहिती पोलिस पंकज परदेशी यांना मिळाली. रात्री तीनच्या सुमारास पोलिस पथक त्या महिलेच्या घरी गेले. मुलगी इतत्र भटकत असताना त्या महिलेने तिला सुरक्षितेतेसाठी स्वतःच्या घरी ठेवल्याचे सांगितले. अनन्याला पोलिसांनी घेऊन तिच्या आईच्या स्वाधीन केले. १८ तास आपल्या लेकीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेच्या माऊलीचे अनन्याला बघून डोळे पाणवले. या चिमुरडीच्या मातेने पोलिसांचे आभार मानले आहेत.