२० हजार कोटी खर्चाचा वडोदरा- मुंबई द्रुतगती महामार्ग तयार करणार – नितीन गडकरी

ठाणे : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गापेक्षाही मोठा असा वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्ग २० हजार कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणार असून येत्या ३ महिन्यात भू संपादन व आवश्यक कामे सुरु होतील अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. वर्सोवा खाडीवर नव्या चौपदरी पुलाचे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जिल्ह्यातील इतर ७ रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिरा रोड येथील एस के स्टोन मैदान येथे इलेक्ट्रॉनिक नामफलकाची कळ दाबून झाले. यावेळी गडकरी बोलत होते.

गडकरी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात येणाऱ्या काळात विकसित वाहतूक आणि दळणवळण यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली न्हावा शेवा शिवडी, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड सारखे प्रकल्प मार्गी लागतील. दोन वर्षांत १० हजार सी प्लेन्स आम्ही आणणार आहेत असे सांगून ते म्हणाले कि,  सागरी जेट्टी, आणि पोर्ट यांना मंजुऱ्या देण्यात येतील. वसई तसेच विरार भागात लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असून त्यामुळे जेएनपीटीतील मोठ्या कंटेनर्सच्या वाहतुकीचा त्रास कमी होईल. मीरा भाईंदर तसेच इतर पालिकांनी देखील इथेनॉल, बायो डीझेल, इलेक्ट्रिकवर परिवहन सेवेच्या बसेस चालवाव्यात आणि खर्चात बचत करावी असेही गडकरी म्हणाले.

मुंबई महानगर क्षेत्र देशाचे ग्रोथ इंजिन होणार- मुख्यमंत्री

गेल्या 70 वर्षांत राज्यात 5000 किमीचे रस्ते होते मात्र  नितीनजी मंत्री झाल्यापासून 20 हजार किमी महामार्गाना मंजुरी मिळालीय.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे व त्यांच्या खात्याचे देशाच्या परिवर्तनात भरीव योगदान आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभी सांगितले.  मुख्यमंत्री म्हणाले की, 22 किमीचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक 4 वर्षांत पूर्ण करणार असून हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू असेल. जलवाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार आहे. सध्याच्या वांद्रे वारली सागरी सेतू वर्सोवापर्यंत तसेच पुढे वसई- विरार पर्यंत कसा जाईल आणि याभागातील नागरिकांना देखील दर्जेदार आणि अद्ययावत वाहतूक सुविधा मिळेल याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. प्रस्तावित वर्सोवा नवा खाडी पूल 18 महिन्यापेक्षा कमी कालावधीत पूर्ण करण्यासाठी मी जिल्हाधिकारी तसेच पोलीस व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तसे निर्देश देत आहे. पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास होत असल्याने मुंबई महानगर क्षेत्र हे आगामी काळात देशातील महत्वाचे ग्रोथ इंजिन बनेल असा विश्वास मुख्यमंत्रयानी व्यक्त केला.  कुठल्याही देशांत पायाभूत सुविधांमूळे लक्षणीय रोजगार निर्मिती होते, आपल्याकडे देखील या पायाभूत सुविधा ज्या झपाट्याने वाढत आहेत त्यामुळे याठिकाणी देखील मोठा रोजगार निर्माण होणार आहे. पाणी, जमीन, वायू आणि पाताळ अशा सर्वच ठिकाणी १ लाख कोटी रुपयांची पायभूत सुविधांची कामे हाती घेतली आहेत. यामुळे एक एकात्मिक वाहतूक प्रणाली निर्माण होऊन मुंबई तसेच महानगर प्रदेशातील सर्व उप नगरांना त्याचा फायदा होईल. होपादापात्तीतील २०११ पर्यंतच्या रहिवाशांना आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे देत असून मध्यमवर्गीयांना परवडणारी घरे देत आहोत असे ते म्हणाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात नितीन गडकरी यांच्या पूर्वीच्या कारकिर्दीत ५५ उड्डाण पूल, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग सारखे मोठे प्रकल्प जलद गतीने पूर्ण झाल्याचा उल्लेख केला. समृद्धी महामार्गामुळे देखील मोठ्या प्रमाणावर विकास होणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. याप्रसंगी  सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री( सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच खासदार चिंतामण वनगा, कपिल पाटील,गोपाळ शेट्टी, आमदार नरेंद्र मेहता, रवींद्र फाटक, हितेंद्र ठाकूर,संजय केळकर, क्षितिज ठाकूर त्याचप्रमाणे महापौर डिंपल मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रस्तावित पुलाची माहिती
कंत्राटदार विजय मिस्त्री आणि एन जी प्रोजेक्ट्स तर्फे या २.२५ किमी पुलाचे काम करण्यात येणार असून यासाठी २४७ कोटी खर्च अपेक्षित आहे. सुमारे १८ महिन्यात हा चार पदरी पूल तयार होणे अपेक्षित आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये जुन्या वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीसाठी हा पूल वाहतुकीस काही प्रमाणात बंद ठेवण्यात आला होता. हा पूल १९६६ च्या दरम्यान बांधण्यात आला होता. सीआरझेड आणि इतर आवशयक परवानग्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून मिळाल्यानंतर पुलाची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!