कल्याण/ प्रतिनिधी -पुरोगामी महाराष्ट्रात एक लाजीरवाणी घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार वडील आणि आजीच्या अंगातील भूत काढण्याचा नादात त्या दोघांना मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना कल्याण जवळील आंबिवली अटाळी परिसरात घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मांत्रिक सुरेंद्र पाटील, पंढरीनाथचा अल्पवयीन मुलगा, चुलत बहिण कविता तरे, चुलत भाऊ विनायक तरे या चौघांना अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीची रवानगी भिवंडी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. या अघोरी हत्याकांडात आणखीन कोणाचा समावेश आहेत याचा पोलीस तपास करीत आहेत.
कल्याणनजीक आंबिवली आटाळी परिसरात राहणारे पंढरीनाथ तरे आणि त्यांची 76 वर्षीय आई चंद्राबाई तरे या दोघांच्या अंगात भूत असल्याने मांत्रिकाच्या सल्ल्याने पंढरीनाथचा अल्पवयीन मुलगा आणि या मुलासोबत चुलत बहिण कविता, भाऊ विनायक यांनी या दोघांना काल दुपारी तीन वाजता घराच्या एका कोप:यात घेऊन गेले. दोघांच्या अंगाला प्रथम त्यांनी हळद फासली. त्यानंतर दांडक्याने दोघांना बेदम मारहाण सुरु केली. गावातील एक मांत्रिक सुरेंद्र पाटील याने या सगळ्य़ांना सांगितले होते की, कविताचा अंगात दैवी शक्ती आहे. पंढरीनाथ आणि चंद्राबाई यांच्या अंगात भूत आहे. भूत उतरण्यासाठी हळदी लावून त्यांना मारहाण करावी लागेल असा अघोरी उपाय सुचविला होता. मांत्रिका सल्ला एकून मुलगा, पुतण्या, पुतणी यानी मिळून हा उपचार सुरु केला. या मारहाणीत पंढरीनाथ व चंद्राबाई यांचा मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर तरे यांचे नातेवाईक हैराण झाले आहे. या घटनेमुळे आंबिवली आटाळी परिसरात खळबळ माजली आहे.
****