मंत्री दादा भुसे- आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाद  

मुंबई :  विधिमंडळाच्या आवारात शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात वाद झाल्याचं समोर आला आहे. या वादात मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार भरत गोगावले यांनी मध्यस्थी केली. एकाच पक्षातील दोन आमदार आपापसात भिडल्याने  राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला. सत्ताधारी पक्षाचे आमदारांमध्ये अशी गुंडागर्दी होणार असेल तर त्याच सरकारने सभागृहात स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी पाटील यांनी केली. 

यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार महेंद्र  थोरवे म्हणाले की, “एका कामासंदर्भात दोन महिन्यांपासून मी दादा भुसेंकडे पाठपुरावा करत होतो. ते काम करण्यास मी त्यांना सांगितलेलं होतं. मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगितलेलं होतं. तरीसुद्धा दादा भुसेंनी जाणीवपूर्वक ते काम घेतलेलं नाही. मग मी आज त्यांना विचारलं की हे काम तुम्ही का घेतलं नाही? तर ते माझ्याशी थोडंसं उद्धटपणे बोलले. तिथं आमच्यात थोडंसं झालं.”

थोरवे पुढे म्हणाले, “आमदारांचे जे काही पेंडिंग कामं आहेत ते पूर्ण झाले पाहिजेत. एकनाथ शिंदे सगळ्या आमदारांची कामं करून देतात. मंत्री महोदयांनीही पटापट कामं करुन द्यायला पाहिजे. मतदारसंघातील कामाच्या बाबतीत बोलत असताना आमच्यात थोडा वाद झाला. आमच्यातला वाद आता मिटलेला आहे. आमच्यात धक्काबुक्की किंवा मारामारी काही झालेली नाही.”

 कोणताही वाद झाला नाही : शंभुराज देसाई

याविषयी स्पष्टीकरण देताना मंत्री दादा भुसे म्हणाले की,  थोरवे माझे सहकारी मित्र आहेत. आमच्यात असा कोणताही वाद  झालेला नाही. मी या बातम्यांचं खंडन करतो. आपल्याला सीसीटीव्ही वगैरे पाहायचे असेल तर ते पाहायला हरकत नाही. दरम्यान, शंभूराज देसाई  यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हटलं की, ‘कोणताही राडा झालेला नाही. एक मंत्री आणि आमदार चर्चा करत होते. चर्चा करताना फक्त आवाज वाढला. संबंधित आमदारांना आम्ही लॉबीमध्ये घेऊन चर्चा केली. वाद झाला नाही, कुणी भिडले नाही. बोलता बोलता मोठ्या आवाजात बोलले म्हणजे वाद झाला का’, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

 विरोधी पक्षांकडून हल्लाबोल 

या प्रकरणावर विधिमंडळात  बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, अशी घटना घडत असेल तर ते गंभीर आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून याची चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली.   तर काँग्रेस नेते नाना पाटोले म्हणाले की,  विधीमंडळ परिसरात घड्लेली घटना असून तिला  गांभीर्याने घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय या घटनेचं गांभीर्य लक्षात घ्यावं असे पटोले म्हणाले.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *